वाठार स्टेशन -अंबवडे संमत वाघोली येथील पाणी शुद्धिकरण करण्यासाठी लागणाऱ्या ब्लिचिंग पावडर गोडाऊनला रात्री शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ब्लिचिंग पावडरचे सुमारे 25 लाखाचे नुकसान झाले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वाठार स्टेशन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हणमंत आबाजी पिसाळ (रा. पळशी ता. कोरेगाव) यांचा आंबवडे संमत वाघोली येथील बनवडी रोड येथे श्री गुरुदत्त एंटरप्रायझेस या नावाने पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या ब्लिचिंग पावडर विक्रीचा व्यवसाय आहे.
काल रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास वादळाने गोडाऊनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन गोडाऊनमधील ब्लिचिंग पावडरच्या चार हजार पिशव्या जळाल्या. रात्रभर गोडाऊनमध्ये गॅस तयार होऊन या गॅसने सकाळी शटर तुटले. शटर तुटल्याने गोडाऊनला आग लागल्याचे बाजूच्या लोकांच्या लक्षात आले. वाठार पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद दाखल करण्याचे काम आज रात्री उशिरापर्यंत चालले होते.