सराव शिबिरात षटकारांची बरसात
चेन्नई – माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने चेन्नई सुपरकिंग संघाच्या सराव सत्रात आपला मूळ फिनिशरचा अवतार दाखवून दिला. आयपीएलसाठी अमिरातीला रवाना होण्यापूर्वी चेन्नई संघाचे सराव शिबिर सुरू करण्यात आले असून त्यात धोनीने फलंदाजीचा मनमुराद आनंद लुटला. वयाच्या 39 व्या वर्षीही आपली तंदुरुस्ती सिद्ध करत त्याने फलंदाजीचा सराव करताना षटकारांची बरसात केली.
या शिबिरासाठी येथे दाखल झाल्यावर धोनीसह सर्वच खेळाडूंची करोना चाचणी झाली व त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने हे सराव सत्र सुरू झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनी प्रथमच सराव सत्रात सहभागी झाला. धोनीच्या सरावातील फटकेबाजीचा व्हिडीओ तसेच फोटो चेन्नई सुपर किंग्ज संघाने सोशल मीडियावर शेअर केला आहे.