-अजित पवारांचे आवाहन
बारामती – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात लवकरच महायुतीचा उमेदवार जाहीर केला जाईल. उमेदवार कोणीही असो मी स्वतः उभा आहे असे समजूनच मतदान करा बारामतीत माझ्या विचारांचा खासदार निवडून द्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीकरांना केले आहे.
राष्ट्रवादी कार्यकर्ते विशाल जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित सभेला मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मला चांगले ओळखतात. त्यामुळे आपल्या विचारांचा खासदार असेल तर विकास कामे झपाट्याने होतील. राज्याबरोबरच केंद्रातील निधी विकास कामांसाठी महत्त्वाचा असतो.
काम करणारे लोकप्रतिनिधी असणे गरजेचे आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत आमदार खासदार आहेत . नुसते इकडे तिकडे फिरणारे खासदार नकोत विकास कामे करणारे महत्त्वाचे आहेत असेल म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. कोणी तुम्हाला भावनिक करतील माझी शेवटची निवडणूक आहे असे सांगतील. असे म्हणत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले. माझ्या विचारांचा उमेदवार निवडून देऊन मला बारामतीच्या विकास कामांची पोचपावती द्या असे आवाहन पवार यांनी केले.