नवी दिल्ली – भारताच्या महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आंदोलनाला यश येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्काली अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक केली जाउन त्यांची रवानगी कोठडीत केली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप ब्रिजभूषण यांच्यावर करण्यात आले होते. त्यातील सहा कुस्तीपटूंच्या जबाबबानंतर पोलीसांनी विविध प्रकारचे गुन्हे ब्रिजभूषण यांच्याविरोधात दाखल केले आहेत. महासंघाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन केले.
तब्बल एक महिन्यानंतर केंद्र सरकार व केंद्रिय क्रीडा मंत्रालयाचे त्यांना ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याचे तसेच अन्याय दूर करण्याचे आश्वासन दिल्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आले, त्याचवेळी 15 जून रोजी पोलिसांना ब्रिजभूषण त्यांच्याविरुद्ध लैंगिक छळ, गुन्हेगारी धमकी तसेच पाठलाग अशा विविध आरोपांखाली आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
तपासानुसार 6 कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांसाठी त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे. तसेच त्यांना अटकही केली जाऊ शकत असून त्यांना शिक्षाही होऊ शकते असे चित्र आता निर्माण झाले असून हा एकप्रकारे कुस्तीपटूंचा मानसिक विजयच मानला जात आहे.
साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनक पदक विजेते कुस्तीपटू या आंदोलनात सक्रीय होत व सातत्याने ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत होते. केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी कुस्तीपटूंच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
ब्रिजभूषण कलम 506 अंतर्गत गुन्हेगारी धमकी देणे, 354 अंतर्गत महिलेचा विनयभंग करणे, 354 अ लैंगिक छळ करणे व 354 ड कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपपत्रानुसार किमान 2 कलमांखाली ब्रिजभूषण यांना कोठडीत टाकले जाऊ शकते, असा दावा कुस्तीपटूंची साथ देत असलेल्या वकिलांनी केला आहे.
तपासादरम्यान तब्बल 108 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आह. त्यांपैकी 15 कुस्तीपटू, प्रशिक्षक व रेफरी यांनीही कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांना दुजोरा दिला आहे. यात लैंगिक छळाच्या 15 तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे. आता ब्रिजभूषण यांच्याबाबत पुढील कारवाई काय केली जाते याकडे या कुस्तीपटूंचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
मेरी कोमच्या अध्यक्षाखालील समिती अडचणीत
कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांचा तपास व चौकशी तसेच देखरेख करण्यासाठी देशाची स्टार महिला मुष्टियोद्धा मेरी कोम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थान करण्यात आली होती. मात्र आता ही समिती देखील वाडाच्या केंद्रस्थानी आली आहे. या समितीने कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपात ब्रिजभूषण यांना क्लीन चिट दिली होती.
तसेच कुस्तीपटूंचे आरोप तथ्यहीन असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता ही समिती व खासकरून मेरी कोम अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. या समितीत मेरी कोमसह अव्वल कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगट, तृप्ती मुरगंडे, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे माजी संचालक राधिका श्रीमन, टॉप्सचे माजी प्रमुख कार्यकारी संचालक राजेश राजगोपलन यांचा समावेश होता व आता हे सगळे टीकेचे धनी बनले आहेत.