मुंबई – शाहरुख खानचा हेरगिरीच्या मुद्द्यावरील बहुचर्चित “पठाण’ पुढच्यावर्षी ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. लॉकडाऊनचे निर्बंध आता उठवले गेल्यामुळे या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले आहे.
शाहरुख खानने सिनेसृष्टीत पदार्पण केल्याला 29 वर्षे ज्या दिवशी सुरुवात झाली, त्याच दिवशी या सिनेमाच्या बंद पडलेल्या शूटिंगला पुन्हा सुरुवात झाली आहे. यशराजच्या स्टुडिओमध्ये “पठाण’च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. पुढील 18 दिवस हे शूटिंग सुरू राहणार आहे.
सिद्धार्थ आनंदच्या या सिनेमातून शाहरुख खानचे पुनरागमन होणार आहे. 2018 च्या “झिरो’ नंतर त्याने तब्बल दोन वर्षे ब्रेक घेतला होता. आपल्या 29 वर्षांच्या करिअरमध्ये शाहरुखने क्वचित एवढा मोठा ब्रेक घेतला असेल.
“झिरो’ बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला होता. त्यानंतर शाहरुखने लगेचच कोणत्याही सिनेमाची ऑफर स्वीकारलेली नव्हती. या अपयशाच्या धक्क्यातून सावरायला त्याला थोडा अवधी लागला होता.
त्यातच करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सर्व सिनेमांची शूटिंग बंद पडली होती. “पठाण’ 2021 च्या ईदला रिलीज होणार होता. आता “पठाण’ 2022 च्या ईदला रिलीज झाल्यावर त्याचे हे कमबॅक किती यशस्वी झाले हे समजेल.