नगर – न्यायप्रविष्ठ झालेली शहर वकील संघटनेची निवडणूक मंगळवार (दि.24) रोजी अखेर बिनविरोध झाली. संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून, शहर वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. भूषण बऱ्हाटे तर उपाध्यक्षपदी ऍड. सुहास टोणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडणूक अधिकारी ए.बी. भालसिंग यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी भूषण बऱ्हाटे, उपाध्यक्षपदासाठी टोणे, सचिव पदासाठी अमोल धोंडे, खजिनदार चेतन रोहकले, महिला सहसचिव मीनाक्षी कराळे आदींनी अर्ज दाखल केले. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी यांनी ही निवडणुक बिनविरोध घोषीत केली. या कार्यकारणीत विनोद शेटे, सुनिल तोडकर, रियाज शेख, संदीप बुरके, दीपक वाऊत्रे, अक्षय भांड व राणी भुतकर यांचा समावेश आहे.
ही निवडणूक बिनविरोध जाहीर होताच न्यायालयाच्या आवारात गुलालाची उधळण करत वकिलांनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी ए. बी. भालसिंग यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी बी. एम. घुले, संदीप शेळके यांनी सहकार्य केले. यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष शेखर दरंदले, उपाध्यक्ष गजेंद्र पिसाळ व खजिनदार राजेश कावरे यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांचे अभिनंदन केले.
नवीन वकिलांसाठी तज्ज्ञांची व्याख्याने…
न्यायालयात काम करताना न्यायाधीश व वकील यांच्यामधील सुसंवाद व समन्वय अजून कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रमुख्याने जे नवीन वकील आहेत त्यांच्यासाठी तज्ज्ञ वकिलांचे विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करणार आहोत, जेणे करून नवीन वकिलांना चांगले मार्गदर्शन होईल. असा मानस भूषण बऱ्हाटे यांनी व्यक्त केला.
त्यामुळे निवडणूक झाली होती न्यायप्रविष्ट
वकील संघटनेची बार असोसिएशनच्या नवीन पदाधिकारी, सदस्य निवडणूक लढविण्यासाठी वकिली व्यवसायातील अनुभव आवश्यक असल्याची अट घालण्यात आली होती. अध्यक्षपदासाठी 15 वर्षं, सचिवपदासाठी 10 वर्षं, सचिवपदासाठी सात वर्ष, कार्यकारणी पदासाठी किमान दोन वर्ष वकिली व्यवसायाची अट घालण्यात आली होती. त्यामुळे नव्याने व्यवसाय करीत असलेल्या वकिलांवर अन्याय असल्याचे कारण देत ही निवडणूक न्यायप्रविष्ट झाली होती.