ज्येष्ठ कवियित्री शोभा जोशी यांचा सन्मान
पिंपरी – “नेसला पिवळा पीतांबर जरी शेला अंगावर भक्तिरसामध्ये दंग विटेवरी उभा, उभा पांडुरंग..’ ही भक्तिरचना आणि “गेल्या जत्रेत झाली आपली भेट, कारभारी आठवा की जरा नीट..’ ही लावणी अतिशय तन्मयतेने सादर करीत यंदा वयाच्या पंचाहत्तरीत प्रवेश करणाऱ्या ज्येष्ठ कवियित्री शोभा शरद जोशी यांनी आपल्या चिरतारुण्याचा उपस्थितांना प्रत्यय दिला.
शब्दधन काव्यमंचाच्या वतीने रविवारी चिंचवड येथे आयोजित “चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या विशेष उपक्रमातंर्गत जोशी यांच्या चिंचवडगाव येथील निवासस्थानी जाऊन शहरातील साहित्यिकांचा त्यांचा सन्मान केला. त्या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया सोळांकुरे होत्या. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, नंदकुमार मुरडे, बाबू डिसोजा, रा.ग.आडकर, राज अहेरराव, श्यामला पंडित, मंगला पाटसकर, नितीन हिरवे, सुहास घुमरे, निशिकांत गुमास्ते, कैलास भैरट, आत्माराम हारे, राजेंद्र घावटे, अशोक कोठारी उपस्थित होते.
“हम साथ साथ है..’ या चित्रपटातील “ये तो सच है के भगवान है.., है मगर फिर भी अंजान है..’ हे गीत कवी देवेंद्र गावंडे यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर करत कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. साहित्यिक प्रदीप गांधलीकर यांनी शोभा जोशी लिखित “डब्यातला लाडू’ हा बालगीतसंग्रह आणि इतर कवितांचे रसग्रहण केले.
सोळांकुरे म्हणाल्या, “”साहित्यिकांनी आपल्या लेखनाबरोबरच सामाजिक जाणिवेतून काम करण्याची नितांत गरज आहे. कथा आणि काव्यलेखनाइतक्याच समाजातील समस्या महत्त्वाच्या असतात. त्यामुळे साहित्यिकांनी सामाजिक विषयांवर व्यक्त झाले पाहिजे.”
अंजली जोशी, मुरलीधर दळवी, अण्णा गुरव, जयश्री गुमास्ते, संध्या गांधलीकर, फुलवंती जगताप, नंदकुमार कांबळे, आय. के. शेख, पुष्पा कुलकर्णी, आनंद मुळूक, रघुनाथ पाटील यांनी संयोजन केले.