जामखेड – येथील ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणीसाठी नागरिकांची प्रचंड हेडसाळ होत असून, फक्त दर शुक्रवारी या दिवशी नोंदणी करण्याचा घाट रुग्णालय प्रशासनाने घातला होता. याबाबत दैनिक प्रभातमध्ये दि. 22 रोजी “विवाह कधीही नोंदणी शुक्रवारीच’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने शुक्रवारी होणारी विवाह नोंदणी करण्याचा निर्णय रद्द करून कामकाजाच्या सर्व दिवशी नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांकडून दैनिक प्रभातचे कौतुक होत आहे .
ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणीसाठी नागरिकांची प्रचंड हेळसांड होत असून, सरकारचा कोणताही नियम नसताना फक्त दर शुक्रवारी नोंदणी करण्याचा घाट रुग्णालय प्रशासनाने घातला होता. लग्न करणे सोपे आणि नंतर विवाह प्रमाणपत्र मिळविणे अवघड अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली होती. या नियमामुळे नागरिकांना रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते.
याबाबत दैनिक प्रभातमधील वृत्ताची रुणालय प्रशासनाने आज (बुधवार) रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांची तातडीने बैठक घेतली. या बैठकीला समितीचे सचिव व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशांक वाघमारे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश आजबे, महिला व बालविकास अधिकारी ज्योती बेल्हेकर, स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले, मझहर खान, मोहित कदम, डॉ. शशांक शिंदे, श्याम जाधवर, रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी समितीच्या सदस्यांनी मनमानी कारभार करणारे रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी चांगलेच फैलावर घेतले. विवाह नोंदणीसाठी अन्यायकारक ठरलेला शुक्रवारचा निर्णय रद्द करत कामकाजाच्या दिवशी विवाह नोंदणी केली जाणार असून, नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी.सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर आणि आपली जबाबदारी पार पाडावी.असेही निर्णय घेण्यात आले.
विवाह नोंदणी ही शुक्रवारी केली जात असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली होती. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या याबाबत दैनिक प्रभातने आवाज उठवल्यानंतर आता शुक्रवारचा नियम रद्द करण्यात आल्याने विवाह नोंदणी शासकीय कामकाजाच्या दिवशी केली जाणार आहे. याबद्दल दैनिक प्रभातचे आभार.
संजय कोठारी, सामाजिक कार्यकर्ते, जामखेड.
नोंदणीसाठी नागरिकांनी योग्य त्या कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत कागदपत्रे जमा करावीत. नागरिकांची हेळसांड होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल.
डॉ. शशांक वाघमारे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, जामखेड.
भावाच्या विवाह नोंदणीसाठी खूप वेळा हेलपाटे मारावे लागले. मात्र, दैनिक प्रभातने यावर वाचा फोडल्याने सर्वसामान्य नागरिकांना विवाह प्रमाणपत्र मिळविण्याच्या अडचणी दूर झाल्या आहेत. दैनिक प्रभातचे मनःपूर्वक आभार.
संजय फुटाणे, शहर उपाध्यक्ष, युवक कॉंग्रेस, जामखेड .