जामखेड – येथील नागेश पवार हा तरुण मोलमजुरी करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी पुणे या ठिकाणी गेला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्याला रेल्वे पोलिसांनी मारहाण केली.
या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते संतोष गव्हाळे यांनी या घटनेची माहिती आमदार राम शिंदे यांना दिली. आज आ. राम शिंदे यांनी विधान भवनात आवाज उठवला. तसेच मयताच्या नातेवाईकांना न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
जामखेड शहरातील आरोळे नगर भागातील तरुण नागेश रामदास पवार हा दोन महिन्यांपूर्वी मोलमजुरी करण्यासाठी पुणे या ठिकाणी गेला होता. याच दरम्यान दि 15 ऑगस्ट रोजी त्याला पुणे येथील रेल्वे पोलिसांनी एका चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. तपासा दरम्यान पुणे रेल्वे स्टेशन पोलिसांनी त्यास मारहाण केली. त्यामुळे या अमानुष मारहाणीत नागेश पवार याचा 23 ऑगस्ट रोजी रात्री मृत्यू झाल्याचा आरोप पवार यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या बाबतची माहिती मयत नागेश याच्या नातेवाईकांनी जामखेडचे सामाजिक तालुकाध्यक्ष संतोष गव्हाळे यांना दिली. त्यांनी ही घटना आज सकाळी आ. प्रा राम शिंदे यांना दूरध्वनीवरून कळविली.
दोषी पोलिसांवर कारवाई करा : आ. पवार
चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतलेल्या जामखेडमधील रमेश पवार या तरुणाचा पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला. विधानसभेत “पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’खाली या गंभीर घटनेकडं सरकारचे लक्ष वेधून दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आणि मयत तरुणाच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.