नवी दिल्ली : शिवसेनेच्या आमदार अपात्र याचिकेवर अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादीमधील अजित पवार गटावर कारवाई करण्यासाठी शरद पवार गटाकडूनही आमदार अपात्रतेसंबधी याचिका दाखल करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदारांवर कारवाई करण्यासाठी पत्र दिले. पण ते वेळखाऊपणा करत असल्याचे म्हणत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली.
त्यानंतर आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान आमदार अपात्रतेसंबधीच्या सुनावणीची तारीख ठरली आहे. आमदार अपात्रतेसंबधीची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला पार पडणार आहे. विशेष म्हणजे शिवसेना 16 आमदार आणि राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची एकत्र सुनावणी पार पडणार असल्याचे समोर आले आहे. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तरी राज्यघटनेच्या 10 व्या सुचीवर संबंधित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने या दोन्ही याचिकांवर एकत्रच सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार गटातील 41 आमदारांना अपात्र करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. पक्षाविरोधात जाऊन अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आमदारांसह नऊ मंत्र्यांवरही कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेना अपात्रतेची सुनावणी आधी नोव्हेंबर महिन्यात पार पडणार होती. मात्र, आता ती शुक्रवारी पार पडणार आहे. राष्ट्रवादीसह शिवसेनेची देखील याचिका प्रलंबित असल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही प्रकरणे एकत्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर काय निर्णय दिला जाऊ शकतो, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.