Ashok Chavan : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण आज अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज पक्षप्रवेश होणार आहे. यासाठी भाजपच्या कार्यालयात जय्यत तयारी सुरु आहे.
अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता अशोक चव्हाण यांचा भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी आमदारकी तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर मी अजून कोणताही निर्णय घेतला नसून 48 तासांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करेन, असे अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तेव्हापासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हंटले जात होते.
अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता. पण अचानक घाईघाईमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने ही तयारी केली जात असल्याचे म्हंटले जात आहे.
अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे भाजपला फायदा होणार?
राज्यसभेत अशोक चव्हाण यांना भाजपने उमेदवारी दिली तर यामुळे काँग्रेसची मते फोडली जाऊ शकतात. त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपला मतदारांचा आकडा वाढवण्यात मदत होणार आहे. यापूर्वी, भाजप पक्षाने विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत हा प्रयोग केला होता. एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेता अशोक चव्हाण यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपची मराठवाड्यात ताकद वाढेल. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.