पुणे – हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री स्मिता पाटील हिचे व्यक्तीगत आयुष्य आणि तिच्या भूमिका यामधील साम्यस्थळांवर प्रकाश टाकणारा “असं एखादं पाखरु वेल्हाळ…’ या 12 मिनिटांच्या लघुपटाची निवड, इंग्लंडमधील पाईनवुड स्टुडिओज आयोजित “फर्स्ट टाईम फिल्ममेकर्स’ नामक प्रतिष्ठेच्या लघुपट महोत्सवासाठी झाली आहे.
पुण्यातील क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असलेल्या मृणाल घोळे-मापुसकर या फिल्मच्या निर्मात्या आहेत. “स्विंगींग क्रॅडल प्रॉडक्शन्स’ या संस्थेची ही निर्मिती आहे. यामध्ये आजच्या पिढीचे प्रतिनिधित्त्व करणारी मृणाल स्मिता पाटीलशी एक एकल संवाद (मोनोलॉग) साधताना दिसते. तिच्या या मोनोलॉगमधून स्मिता पाटीलचे जीवन आणि तिच्या भूमिका तसेच तिचे सामाजिक कार्य, यावरही प्रकाश पडतो.
कवी श्रीनिवास वारुंजीकर यांनी या फिल्मचे दिग्दर्शन केले असून पटकथाही त्यांचीच आहे. तर कुमार डोंगरे यांनी संकलन केले आहे. ओंकार पाटील यांनी टायटल मोन्टाज केले असून सबटायटल्स संगीता कांजलकर तर ज्योती जाधव यांचा मेकअप आहे.
यापूर्वी या फिल्मला लिफ्ट-ऑफ सेशन्स, लंडन, मुव्हिझोन-फ्रेम टु फेम’ केरळ, शॉर्टेड फिल्म फेस्टीव्हल, धर्मशाळा, हिमाचल प्रदेश अशा नामांकित फिल्म फेस्टीव्हलसाठी निवडली गेली होती. या फिल्मला सिनेरसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.