इंदापूर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात जोरदार लढत होणार आहे. पहिल्यांदाच जातीय समीकरण, व विकासकामातून निवडणुकीचा निकाल लागणार आहे. इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप या दोनच राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. मात्र, इतर प्रादेशिक पक्षातून उमेदवारी दाखल करण्याच्या हालचाली वेगाने सुरू आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भरणे तर भाजपाकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे दोन्ही उमेदवार फिक्स मानले जात आहेत. सध्या राष्ट्रवादीची राजकीय ताकद लक्षणीय आहे. विधानसभेच्या उमेदवारीसाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे. तरीदेखील राष्ट्रवादीकडून जो उमेदवार निश्चित होईल, त्या उमेदवाराचे प्रमाणिकपणे काम केले जाईल, असे इच्छुक उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आखाडा तापल्यानंतर पुन्हा बेरजेचे राजकारण आणि जातीय समीकरणे जमेच्या बाजू ठरणार आहेत. इंदापूर तालुक्यातील गावागावांत आमदार भरणे यांच्या माध्यमातून तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी विकासकामांकरिता निधी आणला आहे. दुसरीकडे शेतीसाठी न मिळणारे पाणी, सत्ताधारी भाजपाच्या माध्यमातून आगामी काळात तालुक्याला मिळणारे झुकते माप या दोन मुद्यांवर निवडणुकीची रणधुमाळी गाजणार आहे. जातीय समीकरणे जुळवण्यासाठी जमवाजमव सुरू आहे.