“ई-ऑक्‍शन’चा मार्ग मोकळा

महापालिका आयुक्‍तांनी दिली मान्यता 
पालिकेच्या गाळ्यांचा होणार ऑनलाइन लिलाव
पुणे –
महापालिकेचे व्यावसायिक गाळे तसेच व्यावसायिक मिळकती यापुढे निविदा प्रक्रिया न राबविता “ई-ऑक्‍शन’ (ऑनलाइन बोली लावून लिलाव) द्वारे देण्यास महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे गाळे भाडेकराराने देण्यावरून होणारे वाद तसेच निविदा प्रक्रियेत होणारे हस्तक्षेप दूर होणार असून या वादामुळे वर्षानुवर्षे पडून राहणाऱ्या गाळयांचा वापरही सुरू होणार आहे.

शहरात महापालिकेचे हजारो बांधीव गाळे असून पालिकेकडून ते भाडेकराराने दिले जातात. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून जादा दर देणाऱ्या निविदाधारकास हे गाळे दिले जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत या निविदांबाबत आक्षेप उपस्थित केले जातात. त्यामुळे हे गाळे वर्षानुवर्षे पडून राहतात.

तसेच त्याच्या देखभाल दुरूस्तीचा बोजाही महापालिकेवरच येतो आणि दुसऱ्या बाजूला उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे हे गाळे या पुढे निविदा प्रक्रिया ऑनलाइन राबवून “ई-ऑक्‍शन’द्वारे गाळे देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे अधिकार महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाला असले तरी, भविष्यात वाद उद्भवू नयेत याची खबरदारी म्हणून हा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. आयुक्तांनी त्यास मान्यता दिली असल्याने, या लिलावाचा मार्ग मोकळा झाला असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच या निर्णयाची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू केली जाणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.