ससून,नायडू व अन्य रुग्णालयांना स्वॅब तपासणीसाठी सुरक्षित बूथ भेट

रावेतकर ग्रूपचा उपक्रम

  • सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या संस्था व नागरिकांच्या मदतीने कोरोनाशी सामना – महापौर मुरलीधर मोहोळ
  • डॉक्टर / नर्सेस व तंत्रज्ञ ( टेक्निशियन) यांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था – अमोल रावेतकर
  • कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणे महत्त्वाचे – संदीप खर्डेकर

पुणे: सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून अनेक नागरिक,स्वयंसेवी संस्था विविध माध्यमातून मदत करत असून अश्या सर्वांच्या सहकार्याने कोरोनाशी सामना सुरु आहे, असे मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

रावेतकर ग्रूप तर्फे आज नायडू, ससून व कोरोना ची तपासणी करणाऱ्या रुग्णालयांना स्वॅब टेस्टींग बूथ प्रदान करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रावेतकर ग्रूपचे संचालक अमोल रावेतकर, क्रिएटिव्ह फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर व मनपाचे उप-आरोग्य प्रमुख डॉ वावरे उपस्थित होते. सध्याच्या परिस्थितीत आपले डॉक्टर्स नर्सेस व तंत्रज्ञ अतिशय उत्तम काम करत असून त्यांना आवश्यक असलेले साहित्य पुरविणे व त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य असून मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत ही कौतुकास्पद आणि पुणे शहराच्या लौकिकाला साजेशी बाब आहे असेही महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.

कोरोना बाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी खूप जवळून संपर्क येतो आणि त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. यासाठी केरळ मधे सर्वप्रथम स्वॅब टेस्टींग बूथ ( Kiosk ) ची कल्पना सोशल मीडिया वर बघितली आणि मग आपल्या पुण्यात ही हे प्रत्यक्षात आणण्याचे ठरविले असे अमोल रावेतकर म्हणाले.

त्यानुसारच असे बूथ बनवून घेतले व आज ससून नायडू व अन्य रुग्णालयात हे प्रदान करताना मी माझे कर्तव्य केल्याची भावना आहे असेही त्यांनी सांगितले.या बूथ मुळे तपासणी करणाऱ्या तंत्रज्ञ आणि रुग्णामधे सुरक्षित अंतर राहील व त्यामुळे रुग्णाच्या शिंकण्याचा किंवा खोकण्याचा थेट परिणाम होणार नाही यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे ही रावेतकर म्हणाले.

क्रिएटिव्ह फौंडेशन दानशूर व सामाजिक बांधीलकी मानणाऱ्या व्यक्ती/ संस्था आणि प्रशासन यांच्यामधे दुआ म्हणून काम करत असून निधीचा योग्य उपयोग व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. सद्यस्थितीत अनेक नवनवीन कल्पना पुढे येत असून त्या राबवू पाहणाऱ्यांच्या हेतूबद्दल शंका नाही. पण अश्या अनेक कल्पना निरुपयोगी आणि नागरिकांसाठी घातक ठरण्याची शक्यता असल्याने अतिशय विचारपूर्वक प्रशासनाला सहकार्य करुन ही लढाई आपल्याला जिंकायची आहे असे ही खर्डेकर म्हणाले. मनपाने निर्धारित केलेल्या सर्व केंद्रात हे Kiosk (खोपटे ,बूथ ,केबिन ) बसविण्यात येत आहेत व याद्वारे पी पीई किट चा खर्च वाचेलच पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणी होवू शकेल असेही खर्डेकर म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.