पाणीसाठा आटल्याने हेमाडपंथी मंदिराचे दर्शन

उजनी पाणलोट क्षेत्रातील मंदिर, मूर्तीं, शिल्पकला प्रकटले;
रामायण, महाभारत कालखंडातील पाऊलखुणांना उजाळा
इंदापूर – उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने उजनीच्या पोटात गडप झालेल्या अनेक मंदिरांचे दर्शन होत आहे. त्यामुळे सध्या पर्यटकांना प्राचीन व जुना खजिना कलाकुसर व वास्तुकलेचा नमुना असणारी मंदिरे पाहावयास मिळत आहेत.

पळसदेव येथे सुमारे एक हजार वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाण्याच्या बाहेर आले आहे. मात्र, उघड्या पडलेल्या मंदिरातील आकर्षण असलेल्या रामायण, महाभारतातील शिल्पकलांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अनेक शिल्पे जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेली आहेत. त्यामुळे पळसनाथ मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, अशी मागणी माजी सरपंच अनिल खोत यांनी केली आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पळसदेव येथे विविध प्रकारची प्राचीन मंदिरे आहेत. त्यापैकी पळसनाथाचे हेमाडपंथी मंदिर पाण्याबाहेर आले आहे.

मंदिराला दोन दरवाजे आहेत. त्यापैकी मुख्य प्रवेशद्वार पश्‍चिमेस व उपद्वार दक्षिणेस आहे. मंदिराचे संपूर्ण काम दगड, माती आणि मोठ्या शाळातून करण्यात आले आहे. दरम्यान, ही प्राचीन मंदिरे देशात दोन ते चार ठिकाणीच पाहावयास मिळतात. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात एक व नंतर पळसदेव येथे आहे, असे जाणकार व पर्यटक सांगतात. सध्या मुख्य मंदिरासमोर असलेले नंदीची मूर्ती देखील भंग पावलेली आहे. महारुद्र बजरंगबलीच्या मूर्तीला देखील फुटलेली आहे. मंदिरातील मूर्ती पडलेल्या आहेत.

मंदिरसमोरील भिंत देखील कोसळलेली आहे. मुख्य मंदिराला लागूनच असलेल्या श्री विष्णु मंदिराची देखील दुरवस्था झालेली आहे. मंदिराच्या मोठ्या शिळांना तडे गेलेले आहेत. विशेषत: याच मंदिरात सप्त सूर असलेल्या शिळा पाहावयास मिळतात. या शिळेवर दगडाने मारल्यास प्रत्येक दगडातून वेगळा सूर निघतो. या ठिकाणी एकूण पाच मंदिरे आहेत. यापैकी सध्या तीन मंदिरे पाण्याबाहेर आली आहेत.

दगडी मंदिरावर रामायण व महाभारतातील अनेक क्षण मूर्तीच्या माध्यमातून टिपलेले आहेत. इंद्र दरबारी नाचणाऱ्या विविध देवता अस्त्र व शस्त्र हातात परिधान करू उभ्या आहेत. या मूर्तीची देखील पडझड झाली आहे. या मूर्ती तुटलेल्या अवस्थेत आहेत. कलात्मक मंदिराचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पळसदेवमधील मंदिराकडे येथील नागरिकाप्रमाणे पुरातत्व खात्याने केवळ दिखाऊपणे काम केले आहे. मंदिराची होणारी पडझड रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलत नाहीत, हीच मोठी शोकांतिका आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.