जहॉंगिर हॉस्पिटलला लाखाचा दंड

“एफडीए’ची कारवाई : सूपमध्ये आढळले होते रक्‍ताचे बोळे
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केली कॅन्टिनची तपासणी 
पुणे –
जहॉंगिर रुग्णालयात रुग्णाला दिलेल्या सूपमध्ये रक्ताने माखलेले कापसाचे बोळे आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. हे सूप रुग्णालयाच्या कॅन्टिनमध्येच तयार केले होते. या प्रकराची अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) गंभीर दखल घेऊन कॅन्टिनमध्ये तपासणी केली. त्यात स्वच्छताविषयक बाबींचे आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले.

त्यानुसार सहआयुक्त सुरेश देखमुख यांनी जहांगीर रुग्णालयाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, हॉस्पिटलनेदेखील त्यांची चूक मान्य करत हा दंड भरला आहे. याप्रकरणी महेश सातपुते यांनी सुरुवातीला रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, त्यांनी दखल न घेतल्यामुळे सातपुते यांनी जहॉंगिर हॉस्पिटलविरोधात पोलीस आणि “एफडीए’कडे तक्रार केली. त्यानंतर “एफडीए’च्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दि.6 मे रोजी हॉस्पिटलच्या कॅन्टिनची तपासणी केली.

त्यावेळी त्यांनी अन्न सुरक्षा कायद्यातील तरतुदीनुसार इतर बाबींची पाहणी केली. त्यावेळी कॅन्टिनचालकाकडे “एफडीए’चा परवाना आहे, पण इतर स्वच्छताविषयक बाबी आणि अन्न सुरक्षा मानके कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. हा पाहणी अहवाल न्यायनिर्णय अधिकारी म्हणून सह आयुक्त सुरेश देखमुख यांच्याकडे सादर करण्यात आला.

त्यानंतर “एफडीए’ने हॉस्पिटलला सुधारणा नोटीस पाठवली आणि त्यांचे म्हणणे मांडण्यास संधी दिली. दोन्ही बाजूंचा विचार करता दि.15 मे रोजी “एफडीए’ने त्यांना दंड ठोठावला. याबाबत हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकारी यांना विचारले असता, “”एफडीए’ने हॉस्पिटलच्या कॅन्टिनची पाहणी केली. त्यामध्ये काही गोष्टी व्यवस्थित असून, भिंतींना परत रंग देणे आणि जाळी बदलण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. तसेच “एफडीए’च्या सर्व तरतुदी आम्ही पूर्ण केल्या आहेत’, असे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.