कर्जत -तालुक्यातील देशमुखवाडी येथील खासगी सावकारावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्याजापोटी आतापर्यंत तब्बल 28 लाख रुपयांची परतफेड केल्यानंतरही अतिरिक्त वसुलीसाठी तगादा केल्याने पीडित व्यक्तीने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमृत किसन भिताडे (रा. भिताडेवस्ती परिटवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तालुक्यातील अनेक खासगी सावकारांना आतापर्यंत धडा शिकविला आहे. त्यामुळे बळी पडलेले सर्वसामान्य पीडितसमोर येत आहे. गुन्हे दाखल करत आहेत. त्यात देशमुखवाडी येथील असाच प्रकार समोर आला आहे. या बाबत माहिती देशमुखवाडी येथील एका तक्रारदाराने सावकार भिताडे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तक्रारदाराचा शेतीबरोबरच दूग्ध व्यवसाय होता.
2014 दुष्काळ आणि घसरलेल्या दूध दरामुळे त्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत आला. व्यावसायासाठी काढलेल्या बॅंक कर्जाचे हप्ते व रोजचा चारा भागवण्यासाठी त्यांनी आपल्या ओळखीच्या अमृत किसन भिताडे (रा. भिताडेवस्ती, परिटवाडी) याच्याकडून 3 लाख रुपये 6 टक्के व्याजदराने घेतले होते. मार्च 2021 पर्यंत 34 महिन्यांत त्यापोटी 6 लाख 12 हजार रुपये रक्कम सावकाराला दिली होती.
तथापि, त्यानंतरही सावकार भिताडे यांनी तक्रारदार यांना व्याजाच्या रक्कमेसह मुद्दलाच्या रकमेची मागणी केली. मात्र मोढळे यांच्याकडे देण्याकरता पैसे नसल्याने फिर्यादी व फिर्यादीचे साडू यांनी चारा वाहण्यासाठी आणलेली ट्रॅक्टरची ट्रॉली बळजबरीने मारहाण करून त्यांच्या ट्रॅक्टरने ओढून नेली. आजतागायत ती ट्रॉली सावकाराच्याच ताब्यात आहे.
त्यानंतर 2021 मध्ये फिर्यादीच्या पत्नीचे दागिने पतसंस्थेत तारण मी सोडवून देतो, असे सांगून ठेवलेला 5 तोळ्यांचा सोन्याचा गंठन 73 हजार भरून मुद्दलीच्या रकमेतून कमी करतो म्हणत तो गंठन स्वतः घेऊन गेला. त्यानंतर सावकाराने फिर्यादीच्या घरी येऊन पत्नी व मुलाला शिवीगाळ व दमदाटी केली होती.
घरी येऊन व्याजाच्या पैशांसाठी गायी विकायला लावून त्याचे पैसे स्वतःकडे घेत होता. बॅंकेचे हप्ते भरण्यासाठी पैसे कमी पडल्याने फिर्यादीचे पुन्हा त्याच सावकाराकडुन 22 मार्च 2021 रोजी 4 टक्के व्याजदराने 2 लाख रुपये घेतले. फिर्यादी यांनी 13 लाख मुद्दल रकमेचे मार्च 2021 पर्यंत 28 लाख 86 हजार रुपये दिले आहेत.
फिर्यादीने गाई विकून व्याजाची रक्कम दिलेली होती. मात्र, आता मार्च 2021 नंतर पैसेच नसल्याने व्याजाची रक्कम देता आली नाही. आत्तापर्यंत एवढी मोठी रक्कम देऊनही आणखी 13 लाख मुद्दल व त्यावरील व्याज राहिले आहे असे म्हणत सावकाराने शिवीगाळ धमक्या असे प्रकार सुरू केले होते.मार्च 2021 मध्येही पैशांसाठी राशीनच्या अंबालिका डेअरीवर तसेच पुन्हा महाराष्ट्र बॅंकेसमोरही गचांडी धरून, शिवीगाळ करून दमदाटी केली होती.
त्यावेळी येथील लोकांनी सोडवासोडव केली होती.फिर्यादीने आपण त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मार्च 2021 पर्यंतच्या हिशोब तक्रारीत दिला आहे.कर्जत पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध तक्रारदार यांच्या तक्रारीवरून कलम 392, 452, 504, 506, 34 व महाराष्ट्र सावकारकी कायदा कलम 39 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. इतरही जवळपास 5 ते 6 सावकारांनी फिर्यादीचे पिळवणूक केली आहे. त्याबाबत सुद्धा अधिक माहिती घेऊन कारवाई करण्यात येणार आहे.