नवी दिल्ली – योगगुरू रामदेव बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनने अर्थात आयएमएने केली आहे. रामदेव बाबा यांनी ऍलोपथी उपचार पध्दतीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
रामदेव बाबा यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी करोनावरील ऍलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. कोविड उपचार पद्धतीमध्ये फॅबीफ्लू आणि स्टेरॉईड्ससह अन्य अँन्टिबायोटिकही फोल ठरल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे.
त्यामुळे आयएमएने थेट केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडेच दाद मागितली आहे. आरोग्यमंत्र्यांनी एक तर हा आरोप स्वीकार करावा आणि आधुनिक उपचार पद्धती बंद करावी. नाहीतर मग रामदेव बाबा यांच्याविरोधात कारवाई करुन साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आधुनिक उपचार पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संकटाच्या काळात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या 1 हजार 200 डॉक्टरांनी बलिदान दिले आहे, याकडेही आयएमएने लक्ष वेधले आहे.
ऍलोपथी एक स्टुपिड, दिवालीया सायन्स है, लाखो लोगोंकी मौत ऍलोपथी की दवाई खाने से हुअी है असे रामदेव बाबा त्या व्हिडिओत बोलताना दिसून येत आहेत.