नवी दिल्ली – “यास’ वादळाचे रूपांतर हे अतितीव्र वादळात होण्याची शक्यता असून ते ओडिशा आणि प. बंगालच्या किनाऱ्यावर 26 मे रोजी धडकण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने शनिवारी दिली.
बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या अंदमान समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याची तीव्रता उद्यापर्यंत वाढण्याजोगी स्थिती निर्माण झाली आहे. त्याचे रुपांतर वादळामध्ये उद्या सकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्याचे चक्रीवादळात रूपांतर सोमवारी सकाळी होऊन त्याचे अतितीव्र वादळात त्यापुढील 24 तासांत रूपांतर होईल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हे वादळ ओडिशा अणि प. बंगालच्या दरम्यान 26 तारखेला जमीनीवर धडकण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात तौक्ते वादळाने गुजरातच्या किनारपट्टीला धडक दिली. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे वादळ नंतर शांत झाले असले,तरी त्याचे परिणाम हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडपर्यंत पाहायला मिळाले.
एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-डिसेंबर या काळात वादळे पाहायला मिळतात. गेल्या मे महिन्यात बंगालच्या उपसागरात शम्फान हे वादळ झाले होते. तर अरबी समुद्रात निसर्ग वादळाने तडाखा दिला होता. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात नासधूस झाली होती.