राजगुरुनगर – राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या निवडणूक थेट दोन पॅनलमध्ये रंगणार आहे. तर दोन अपक्षांचेही आव्हान असणार असल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे.
माघारीनंतर सर्वसाधारण गटातील 12 जागांसाठी किरण आहेर, समीर आहेर, दिनेश ओसवाल, निलेश आंधळे, विष्णू कड, संतोष काचोळे, अंकुश कोहिनकर, किसान गारगोटे, बाळासाहेब गारगोटे, विनायक घुमटकर,राहुल तांबे, अरुण थिगळे, गणेश थिगळे, सतीश नाईकरे, विश्वास चेहेरे, सागर पाटोळे, दत्तात्रय भेगडे, किरण मांजरे, राजेंद्र वाळुंज, कालिदास सातकर, राजेंद्र सांडभोर, सुभाष होले असे तब्बल 23 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
महिला गटातील दोन जागांसाठी तिरंगी लढतीत विद्यमान संचालिका विजया शिंदे, हेमलता टाकळकर या दोघीसमोर अश्विनी पाचारणे यांनी तर भटक्या जाती जमाती, विशेष मागास प्रवर्गाच्या एका जागेसाठी विद्यमान संचालक ऍड. दत्तात्रय गोरे यांच्यासमोर शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामदास धनवटे यांनी तगडे आव्हान उभे केल्याने या गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजगुरूनगर येथे तब्बल 27 मतदान केंद्रातून 13 हजार 345 मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महात्मा गांधी विद्यालय, शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालय, खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या केटीईएस अर्थात इंग्रजी माध्यम विद्यालय या तीन ठिकाणी मतदान होणार आहे.
चाकण येथे शिवाजी विद्यामंदिर आणि सीताबाई भिकोबा पाटोळे कनिष्ठ महाविद्यालय ही मतदान केंद्र असून येथे 4 हजार 969, कडूस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 2 हजार 767, पाईट येथे जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र असून 347, महाळुंगे इंगळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 410, श्रीक्षेत्र आळंदी येथे नगरपरीषदेच्या शाळा क्रंमाक 1 मध्ये 289 मतदार मतदान करणार आहेत.
देहू रोड आकुर्डी परिसरातील मतदारासाठी देहुरोड कॅन्टोनमेंट बोर्डातील महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय मराठी शाळेत 1249, भोसरी येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज प्राथमिक विद्यालयात 1940 मतदारांच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे येथील बुधवार पेठेतील विद्या प्रसारणी सभेचे शेठ हिरालाल सराफ प्रशाला मतदान केंद्रावर 493 मतदारांच्या मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यात पाबळ येथे श्री भैरवनाथ विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात 357, शिरूर येथील नगरपालिकेच्या सेंटर शाळा क्रंमाक 6 मध्ये 436 मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये 593. जुन्नर तालुक्यातील जुन्नर शहरातील नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात 121, केंद्रावर 1753, आळेफाटा येथील जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्रावर 150 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
ओबीसी गटात तिरंगी लढत
ओबीसी गटातील एका जागेवर तिरंगी लढत होत असून विद्यमान संचालक धनजय कहाणे यांनी माघार न घेता दोन्ही पॅनलमध्ये न जाता “एकला चलोची’ भुमिका घेतल्याने ते अपक्ष निवडणुकीत उतरले आहेत. दोन्ही पॅनलमधील नवीन चेहऱ्यासमोर आव्हान देताना कोणाला नारळ मिळणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
यंदा मतदानाचा टक्का वाढणार
राजगरूनगर सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी येत्या 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. बॅंकेच्या 29 हजार 219 सभासद मतदारांना मतदानाचा हक्क बजावणार असला तरी यंदा दोन पॅनलेच्या अटीतटीच्या लढतीमुळे मतदानाचा टक्का वाढणार आहे.