युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की काही मुरब्बी राजकारणी नाहीत किंवा धूर्त-चलाख नेते नाहीत. त्यामुळेच विनोदी अभिनेता म्हणून काम करताना त्यांनी भ्रष्टाचारावर जे कोरडे ओढले त्याला जनतेकडून प्रतिसाद मिळत गेला आणि तो त्यांना अध्यक्षपदापर्यंत पोचण्यास उपयुक्त ठरला. आज रशियाने आक्रमण केल्यावर पैशांनी बॅगा खच्चून भरायच्या आणि विमानाने पळून जाऊन एखाद्या देशात आश्रय घेणे त्यांना सहजशक्य होते, पण त्यांनी युक्रेनमध्येच जनतेसोबत राहून रशियाच्या फौजांना प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच त्यांच्याविषयी जगभरात कुतूहलमिश्रित लोकप्रियता तयार झालेली दिसते.
साधारणपणे साडेसहा वर्षांपूर्वी म्हणजे 2015 मध्ये वोलोदिमीर झेलेन्स्कींची सर्व्हंट ऑफ द पीपल ही मालिका युक्रेनमधील दूरचित्रवाणीवर सुरू होती. त्यामध्ये त्यांनी एका शिक्षकाची भूमिका केली होती जो नंतर अपघाताने युक्रेनचा अध्यक्ष होतो असे त्यामध्ये दाखवण्यात आले होते. युक्रेनमधील राजकारणाबाबत हा शिक्षक अतिशय तावातावाने आणि थेट रस्त्यावरच्या भाषेत बोलताना रंगवण्यात आला होता.
2019 मध्ये अपघाताने हे सगळे प्रत्यक्षात आले आणि तब्बल 73 टक्के मते मिळवून झेलेन्स्की युक्रेनचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. अध्यक्ष म्हणून निवडून येण्याआधी विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख असली तरी मुळात ते प्रशिक्षित वकील आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांचे पन्नास लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
राजकारणात ते नवखे असले तरी त्यांनी देशातील भ्रष्टाचाराच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना जनतेचे पाठबळ मिळत गेले. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1978 रोजी युक्रेनच्या दक्षिण भागातील क्रिव्ही रिह या औद्योगिक शहरात झाला. ते लहान असतानाच त्यांचे कुटुंब मंगोलियातील एर्देन्त येथे स्थलांतरीत झाले होते. चार वर्षांनी ते पुन्हा क्रिव्ही रिह येथे परतले आणि त्याठिकाणी झेलेन्स्कींचे शालेय शिक्षण सुरु झाले. त्यांचा जन्म ज्यू कुटुंबात झाला असला तरी युक्रेनच्या नायप्रोपेत्रोस्क प्रांतातील वातावरणाप्रमाणे रशियन भाषा बोलत ते मोठे झाले. परंतु युक्रेनियन आणि इंग्लिश या भाषांवरही झेलेन्स्कींचे प्रभुत्व आहे.
1995 मध्ये क्रीव्ही नॅशनल इकॉनॉमिक इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि 2000 मध्ये त्यांनी कायद्याची पदवी संपादन केली. त्यांच्याकडे वकीलीची सनद असली तरी त्यांची कारकिर्द वेगळ्याच दिशेने वाटचाल करू लागली होती. विद्यार्थी दशेतच त्यांना नाटकांमध्ये काम करण्याची आवड निर्माण झाली होती आणि तिकडेच त्यांचा ओढा होता. महाविद्यालयात शिकत असतानाच विनोदी मालिकांच्या स्पर्धेमध्ये क्वार्ताल95 या त्यांच्या ग्रुपने भाग घेतला होता. क्वार्ताल95 हे नाव क्वार्टर95 वरून आले आहे. क्रीव्ही रिव्हमधील एका भागाच्या नावावरून त्यांनी ग्रुपचे नाव क्वार्ताल95 असे ठेवले होते. याच नावावरून 2003 मध्ये त्यांनी स्टुडिओ क्वार्ताल95 नावाने प्रॉडक्शन कंपनी सुरु केली.
2011 पर्यंत ही कंपनी निर्मितीक्षेत्रात काम करत होती. नंतर त्यांची युक्रेनच्या इंटर टीव्ही या वाहिनीवर निर्माता म्हणून नेमणूक झाली. 2012 मध्येच त्यांनी ही नोकरी सोडली आणि त्यांच्या क्वार्ताल95 ने युक्रेनमधील वन प्लस वन या टीव्ही नेटवर्कबरोबर काम सुरु केले. युक्रेनमधील वादग्रस्त श्रीमंत उद्योगपती इहोर कोलोमॉईस्की यांच्या मालकीचे हे टीव्ही नेटवर्क आहे. ते स्वतः सध्या परांगदा होऊन इस्रायलमध्ये वास्तव्यास आहेत. त्यामुळेच जेव्हा झेलेन्स्की यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा इरादा जाहीर केला तेव्हा त्यांच्या कोलोमॉईस्की यांच्याबरोबरील व्यावसायिक संबंधांची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती.
या काळात झेलेन्स्की यांनी अनेक चित्रपटातही काम केले. अगदी ऐतिहासिक प्रहसनापासून ते रोमँटिक कॉमेडीपर्यंत विविध चित्रपटात त्यांचा मुक्त संचार होता. त्यांची सगळ्यात गाजलेली भूमिका म्हणजे सर्व्हंट ऑफ द पीपल मधील इतिहासाच्या शिक्षकाची. त्यातील त्यांच्या भारावून टाकणाऱ्या भाषणांच्या अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या आणि त्यांनीच झेलेन्स्की यांना पुढे अध्यक्षपदापर्यंत पोचवले.
अध्यक्ष झाल्यानंतर संसदेत केलेले त्यांचे पहिलेच भाषण गाजले होते. त्यावेळी त्यांनी प्रशासनाला जाहीरपणे सांगितले होते की, अध्यक्ष म्हणून माझी छायाचित्रे कुठेही लावू नका. त्याऐवजी तुमच्या मुलांची छायाचित्रे त्याठिकाणी लावा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी मुलांच्या डोळ्यात पहा. झेलेन्स्की यांचा हा व्हिडिओदेखील जगभरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.
नंतरच्या काळात त्यांचे अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन (नाटो) या रशियाच्या विरोधातील लष्करी कराराशी युक्रेन जोडले जाण्याचे प्रयत्न, अमेरिका आणि नाटोचे राजकारण, त्यातून अमेरिका थेट आपल्या दारात येऊन उभी रहात असल्याची भिती रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना वाटणे, त्यांचा आक्रमक स्वभाव यातून आजचे युद्ध सुरू झाले. हा सगळा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग आहे. लष्करी सामर्थ्यांच्या दृष्टीने अतिशय बलाढ्य असणाऱ्या रशियाने आक्रमण केल्यावर नाटो आणि अमेरिकेने बोटचेपी भूमिका घेऊन युक्रेनला वाऱ्यावर सोडले तरी झेलेन्स्की ठामपणे रशियाच्या विरोधात उभे राहिल्याने जगभर त्यांच्याविषयी कुतूहलमिश्रित लोकप्रियता निर्माण झाली. झेलेन्सकींच्या सांगण्यानुसार त्यांची हत्या करण्याचा रशियाचा कट आहे.
राष्ट्रप्रमुखांची हत्या करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या संपवून टाकण्याची रशियाची योजना आहे, असे ते सांगतात. असे असले तरी रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतरही ते युक्रेनमध्येच ठाण मांडून बसले आहेत. एखादा राष्ट्रप्रमुख पैशाच्या थैल्या विमानात भरून पळून गेला असता आणि दुसऱ्या सुरक्षित देशात राजकीय आश्रित म्हणून राहिला असता. पण झेलेन्स्की यांनी दुसरा आणि अवघड मार्ग स्वीकारलेला आहे. ते युक्रेनची राजधानी कीव्हच्या रस्त्यांवर फिरतात, रशियाच्या आक्रणाला विरोध करण्याचे आवाहन देशवासियांना करतात. त्याचा परिणाम म्हणजे युक्रेनमध्ये रशियाला चिवट प्रतिकार होताना दिसत आहे.
झेलेन्स्कींच्या मते त्यांच्यानंतर त्यांचे कुटुंबिय रशियाच्या रडारवर आहेत. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएचे संचालक विल्यम जे बर्न्स यांच्याबरोबर त्यांची जानेवारीत बैठक झाली होती. त्यावेळी रशियाच्या वाढत्या आक्रमक हालचाली पाहता तुम्हांला आणि तुमच्या कुटुंबियांना धोका जाणवतो का, असे बर्न्स यांनी विचारले होते. त्यावेळी रशिया आपल्या हत्येचा प्रयत्न करेल याबाबत झेलेन्सकी साशंक होते. सध्या सुरक्षेच्या कारणावरून पत्नी आणि दोन मुलांचा ठावठिकाणी त्यांनी जाहीर केलेला नाही. त्यांची पत्नी ओलेना झेलेन्स्की यांनी मागील आठवड्यात इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले होते की, माझी मुले माझ्याकडे पहात आहेत, मी त्यांच्याजवळ आहे आणि पतीच्या समवेत तुमच्याबरोबर आहे.