पोटच्या लेकरासाठी बिबट्याशी झुंज

पिंपरी – पोटच्या गोळ्याला बिबट्या ओढून घेऊन जात आहे, हे पाहून शरीरातील सारे बळ एकवटून आई-वडिलांनी थेट बिबट्याशी झुंज देत दीड वर्षाच्या मुलाला वाचवले. सध्या जखमी मुलावर पिंपरी येथील डॉ. यशवंतराव स्मृती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुन्नर येथे राहणाऱ्या दीपाली व दिलीप माळी या दांपत्यास ज्ञानेश्‍वर हा एक दीड वर्षाचा मुलगा आहे. सध्या ज्ञानेश्‍वर पिंपरी येथील डॉ. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार घेत आहे. बाळाची आई दीपाली यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, ऊसतोड कामगार असल्याने दिवसभर काम करून आल्यानंतर उन्हाळ्यामुळे शेतात झोपडीच्या बाहेर बाळासह झोपले होते.

मध्यरात्री दीड वाजता अचानक बिबट्याने ज्ञानेश्‍वरवर हल्ला चढवला. ज्ञानेश्‍वर रडत असल्याने दिपाली यांना जाग आली. समोर भीतीदायक दृश्‍य दिसत होते. ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली बिबट्या बाळाचा पाय धरून बाळाला घेऊन चालला होता. दिपाली यांनी उठून बाळाचा दुसरा पाय धरला व शेवटपर्यंत सोडला नाही. तोंडात आलेले बाळ आपले भक्ष्य समजून बिबट्या सोडण्यास तयार नव्हता. वडिलांनीही आपल्या बाळाला वाचवण्यासाठी बिबट्याच्या तोंडावर मिळेल ती वस्तू मारण्यास सुरुवात केली. बाळ जाण्याच्या भीतीने टाहो फोडत संघर्षही सुरूच ठेवला होता. अखेर बिबट्याने धूम ठोकली. बाळाच्या पायाला आणि डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. बाळाला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ज्ञानेश्‍वरची प्रकृती स्थिर असून तो लवकरच बरा होईल, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.