सोलापूर, – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील “फटे स्कॅम’ची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरु होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे हा काही दिवस फरार देखील होता. दरम्यान सोमवारी स्वत:हून पोलिसांत हजर झाल्यानंतर फटे याला आज बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले.यानंतर न्यायालयाने फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी विशाल फटे याने सोमवारी सकाळी स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली आणि रात्री तो पोलिसांत हजर देखील झाला. ज्यानंतर आज (मंगळवारी) त्याला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले.
यावेळी फटेच्या वकिलांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. पण याला विरोध करत सरकरी वकिल प्रदीप बोचरे यांनी पोलिसांची बाजू मांडली. यानंतर न्यायालयाने फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.