मुंबई- जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर अर्थ मंत्रालयाने जीएसटी संकलान वाढ होवून ते 1.29 लाख कोटी रुपये झाल्याची आकडेवारी जाहीर केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक उसळले. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक काही प्रमाणात कमी झाला असला तरी गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 929 अंकांनी म्हणजे 1.60 टक्क्यांनी वाढून 59,183 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 281 अंकांनी वाढून 17,625 अंकांवर बंद झाला. यामुळे एकाच दिवसात गुंतवणूदारांच्या गुंतवणूक मुल्यात 3.49 लाख कोटींनी वाढ झाली.
राठी शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स या संस्थेचे संशोधक नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, डिसेंबरमधील जीएसटी संकलन वाढले आहे. त्याचबरोबर जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आल्यामुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली असल्याचे वातावरण होते.
मुंबई शेअर बाजाराचा आणि स्मॉल कप 1.2 टक्क्यापर्यंत वाढले. केवळ औषधी क्षेत्राचा निर्देशांक 0.5 टक्क्यांनी कमी झाला. इतर सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले असल्याचे दिसून आले.
मुंबई शेअर बाजारावर नोंदलेल्या 2,600 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर केवळ 880 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. त्यामुळे शेअर बाजारातील एकूण वातावरण सकारात्मक राहण्याची शक्यता असल्याचे दिसून येते.
बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, आयसीआयसीआय बॅंक, ऍक्सिस बॅंक, टाटा स्टील, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी बॅंक, साडेतीन टक्क्यांपर्यंत वाढले. डॉक्टर रेड्डीज, महिंद्रा, टेक महिंद्रा या कंपनीच्या शेअरच्या भावात घट नोंदली गेली. आता परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खरेदी करीत असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 575 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. शेअर निर्देशांकात वाढ झाल्यामुळे क्रुडचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
निफ्टी महत्वाच्या पातळीवर
दिनदयाळ इन्व्हेस्टमेंटस्चे विश्लेषक मनिष हाथीरमानी यांनी सांगितले की, निफ्टीने 17,600ची पातळी गाठणे महत्वाचे होते. आता निफ्टी या पातळीच्या पुढे आहे. आता निफ्टीने वरच्या दिशेने आगेकूच चालू ठेवली तर निफ्टी 17,850 या पातळीपर्यंत आगेकूच करू शकतो. मात्र काही गुंतवणूकदार परिस्थितीजन्य कारणामुळे नफेखारी करण्याची शक्यता आहे. तसे झाले तर निर्देशांक आगेकूच थांबवतील.