खराब हवामानामुळे शेतकरी चिंतेत

समीरण बा. नागवडे

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला : उत्पन्नात घट होण्याची धास्ती

तर औषधांचा खर्च जाणार वाया
या खराब हवामानाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध औषधांचे फवारे पिकांवर मारण्यास प्रारंभ केला आहे. मात्र हवामानात बदल न झाल्यास हा खर्च वाया जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

श्रीगोंदा  – पावसाळ्याच्या शेवटी जोरदार पाऊस झाल्याने तालुक्‍यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून खराब हवामानामुळे व थंडी कमी असल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. मागील वर्षी दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर यावर्षीचे हातातोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली अन्‌ ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा, तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करण्यात आली. यावर्षी कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकरी कांद्याकडे वळाले आहेत. त्याचबरोबर गहू, ज्वारी, हरभरा या पिकांना देखील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले.

परंतु गेल्या आठवड्याभरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. एवढेच नव्हे, तर डिसेंबर संपत आला, तरी थंडी अद्याप वाढलेली नाही. ढगाळ वातावरण व थंडीची उणीव असल्याने परिणामी, उत्पन्नात घट होण्याची धास्ती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. सततचे ढगाळ वातावरण व थंडी कमी असल्याने गव्हावर मावा पडला आहे. एवढेच नव्हे, तर काही भागात गव्हाला अळीचाही प्रादुर्भाव झाल्याचे पहायला मिळते.

प्रतिकूल हवामानामुळे नवीन लावलेल्या कांद्याला देखील करप्याने वेढले आहे. त्यामुळे कांद्याची नवीन लागवड धोक्‍यात आली आहे. मागील वर्ष दुष्काळात गेल्याने नियोजित पिके घेता आली नाहीत. यावर्षी शेवटी पाऊस झाल्याने पाणी उपलब्ध झाले. परिणामी यावर्षी चांगल्या उत्पन्नाची शेतकऱ्यांना आशा होती. परंतु ढगाळ वातावरण आणि थंडी कमी असल्याने यावर्षीच्या उत्पन्नावर देखील पाणी फिरते की काय अशी धास्ती शेतकऱ्यांना आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.