वाघोली – पेरणे (ता. हवेली) येथे पेरणे फाट्यावर पूर्व हवेली, खेड व दौंड तालुक्यातील भामा आसखेड पुनर्वसन बाधीत शेतकरी बांधवांच्या सातबारावरील पुनर्वसनासाठी राखीव शेरे काढण्यासाठी दि. 2 ऑक्टोबर पासून हवेली तालुका भाजप अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यास शेतकरी वर्गाकडून मोठा पाठिंबा मिळू लागला आहे.
अनेक गावचे शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहू लागले आहे. पुनर्वसनासाठी राखीव शेरे काढण्याबाबत शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते.
याबाबत शिरूर-हवेलीचे आमदार देखील प्रयत्नशील आहेत. मात्र हवेली तालुका भाजपाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या आमरण उपोषण आंदोलनामुळे शेतकरी वर्गाचा हा प्रश्न लवकर सुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.