उजनी पाणी प्रश्न | पुणे-सोलापूर सीमारेषेवर शेतकऱ्यांनी घातले जागरण गोंधळ, म्हणाले… ‘सरकारला सद्बुद्धी दे’!

वडापुरी(प्रतिनिधी) –  इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टी.एम.सी. पाणी देण्यात यावे, या योजनेचा सर्वेक्षणाचा आदेश रद्द केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाविसाव्या वर्धापन दिनी शेतकऱ्यांनी पुणे सोलापूरच्या सीमारेषेवर जागरण गोंधळ घालत आंदोलन छेडले. रद्द केलेला आदेश तात्काळ पूर्ववत करण्याची सद्बुद्धी सरकार दे अशी मागणी आंदोलकांनी खंडेराया चरणी केली आहे.

इंदापूर तालुक्याला उजनी येणाऱ्या सांडपाण्यातून पाच टीएमसी पाणी देण्याला सोलापूर करांनी प्रचंड विरोध दर्शविला. सोलापूर करांची नाराजी पाहता राज्यसरकारने सर्व्हेक्षणाचा काढलेला आदेश तात्काळ रद्द केला. मात्र आम्ही सोलापूर करांच्या हिश्श्याचे पाणी मागत नाही त्यामुळे रद्द केल्या आदेशाचा पुनर्विचार करावा व तालुक्यातील शेतकरी हिताचा निर्णय राज्यसरकारने करावा यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकरी पेटून उठले आहेत.

मागील सप्ताहापासून तरटगांव हद्दीतील गेटसमोर पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकत्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास अधिक बळकट करण्यासाठी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिता नानासाहेब खरात व नानासाहेब खरात यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनीच जागरण गोंधळ घालून सरकारला जागे करणार असल्याचे दोन दिवसापूर्वीच  निवेदन दिले होते. त्यानुसार पुणे सोलापूर सीमारेषेवर गुरूवारी दि.10 रोजी जागरण गोंधळ घालत शेतकरी पुत्रांनी आपला आवाज राज्यसरकार पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान या जागरण गोंधळ आंदोलनास व तरडगांव गेटसमोरील सुरु असलेल्या संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनास आपला पाठिंबा देण्यासाठी लहूजी शक्ती सेना,तरटगांव ग्रामपंचायत, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,डाॅ.शशिकांत तरंगे, पंचायत समिती सदस्यांना सतिष पांढरे,शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, युवक तालुकाध्यक्ष शुभमं निंबाळकर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष सागर मिसाळ सरडेवाडी चे सरपंच सिताराम जानकर वडापुरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे यांसह अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवला.

शेतकरी कृती संघर्ष समितीत फूट ; येत्या पाच दिवसात दुसरी समतोल स्थापन होणार …

इंदापूर तालुक्यास देण्यात येणाऱ्या ५ टीएमसी पाण्याच्या सर्व्हेक्षणाचा आदेश 24 मे ला रद्द झाल्यानंतर एक विचाराने न्यायालयीन लढा देण्यासाठी शेतकरी कृती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. लाखेवाडी येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये या समितीचे अध्यक्ष पद माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमत ढोले यांकडे सोपवण्यात आले.मात्र सदरची समिती ही रस्तावरची लढाई लढण्यासाठी तयार नसल्याने येत्या पाच दिवसात रस्तावरच्या आणि न्यायालयीन लढ्यासाठी नव्या शेतकरी कृती संघर्ष समितीची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा डाॅ.शशिकांत तरंगे यांनी केली. आमचे विचार सदरील समितीस मान्य असतील तर ते आमच्याबरोबर येतील किंवा आम्ही त्यांच्याबरोबर जावू असंही डाॅ.तरंगे म्हणाले आहेत.

उजनी धरणातून 5 टीएमसी पाणी वाटपाचा जो निर्णय इंदापूर तालुक्यासाठी करण्यात आला होता तो रद्द झालेला आदेश पूर्ववत करावा. उजनीच्या पाण्याचे ऑडिट व्हावे. मराठवाड्याची 21 टीएमसी पाणी योजना रद्द करावी तसेच उजनी धरणा वरून मराठवाड्यात होणारा पाणी पुरवठा बोगदा मार्ग तात्काळ बंद करावा.तरटगाव धरण गेट येथे चालू असलेल्या आंदोलनास पाच ते सहा दिवस झाले असून त्याची तात्काळ दखल घ्यावी. इंदापूरच्या हक्काचे पाणी इंदापूरला मिळावे. इंदापूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या त्यांना मोबदला तात्काळ मिळावा.  अशा अग्रणी मागण्या आंदोलकांनी केल्या असून मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.