पुणे- राज्य गुन्हे अन्वेषन विभागाने (सीआयडी) आदर्श गुन्हे तपास पद्धती (एसओपी) तयार केली आहे. बदलती सामाजिक व आर्थिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, विज्ञानाने केलेली प्रगती, बदलते कायदे या सर्व गोष्टींचा विचार करून पोलिस अधिकारी व अंमलदारांनी तपास कसा करावा या सर्वबाबी एसओपीत नमूद करण्यात आल्या आहेत. गुन्हे तपासातील कार्यक्षमता वाढविण्यासाठी या एसओपीचा पोलिस घटकांनी वापर करावा, अशा सूचना सर्व पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात बदलत्या काळानुसार गुन्हेगारीत देखील बदल होत चालला आहे. पारंपारिक गुन्ह्यांबरोबरच आता सायबर व आर्थिक गुन्हे वाढू लागले आहेत. तसेच, गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पध्दत सुद्धा बदलत आहे. त्याचबरोबच नवनवीन कायदा येत आहेत. गुन्हेगारांनी गुन्हे केल्यास त्यांना शिक्षा होण्यासाठी तपास व्यवस्थित करणे खूप गरजेचे असते. तपास व्यवस्थित झाल्यास आपोरीच्या विरोधात कोर्टात गुन्हा सिध्द होते. तपासामुळे आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात देखील वाढ होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सीआयडीने पोलिस अधिकारी व अंमलदारांसाठी एसओपी तयार केली आहे.
एसओपी तयार करण्यासाठी विविध संदर्भ ग्रंथ, महत्वाचे न्याय निवाडे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. पोलिस तपासासाठी महत्वाचे ठरतील असे मुद्दे एसओपीमध्ये समाविष्ठ करण्यात आले आहेत. गुन्हे तपासातील कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही एसओपी पोलिस अधिकारी व अंमलदारांना उपयुक्त ठरेल. त्यामुळे तपास गुणवत्ता पूर्वक होऊन आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यास मदत होणार आहे.
सीआयडीने तयार केलेली एसओपी सर्व पोलिस घटकांनी वापरावी. त्या घटकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या एसओपीमध्ये काही गोष्टी अनावधाने राहिल्या असल्याचे जाणवल्यास त्यांनी काही मुद्द्यांची भर घालवी. त्यामुळे एसओपी आणखी परिपूर्ण होईल. ती माहिती सीआयडीला द्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण साळुंके, फत्तेसिंह पाटील, मकरंद रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक संदीप दिवान, संभाजी कदम, श्रीकांत धिवरे यांच्या सहकार्याने पोलिस अधिक्षक पल्लवी बर्गे व इतर सर्व अधिकारी व अंमलदार यांनी एसओपी तयार करण्यासाठी परिश्रम घेतले.