पळसदेव (रामदास पवार) – इंदापूर तालुक्याला नीरा व भीमा या दोन नद्या वरदान ठरल्या आहेत. बारमाही पाणी असल्यामुळे इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र पाहायला मिळत आहे; मात्र सध्या उसाचा बाजारभाव व वेळेवर उसाचे पेमेंट न मिळणे यामुळे शेतकरी ऊस सोडून फळ पिकांकडे वळत असल्याचं पाहायला मिळत आहे. फळ पिकातून शेतकरी लखपती होत असल्याचे चित्र सध्या तालुक्यातील विविध गावात पाहायला मिळत आहे. पळसदेव भागातील माळेवाडी येथील बाळासो केशव बनसुडे या शेतकऱ्याने अर्धा एकर शेतात पेरूचे बारा लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे.
बनसुडे यांनी अर्धा एकर शेतात 300 पिंक तैवान जातीच्या पेरूची लागवड केली आहे. लागवड करताना पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत मशागत करून पेरूची लागवड केली. यामध्ये वीस रुपये प्रमाणे रोपांचा सहा हजार रुपये खर्च आला. मशागतीला पाच ते सहा हजार रुपये खर्च आला. खते वापरताना शेणखत, कोंबड खत, निंबोळी खत याला सुमारे पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आला. ड्रीप करून रोपाला पाणी देण्याची सोय केली. ड्रीप करण्यासाठी पंचवीस ते तीस हजार खर्च आला. औषधांसाठी पेरूवर मलिबग (पांढरा मावा) आल्यावर कीटकनाशक फवारणी करून मावा आटोक्यात आणता येतो.
उत्पन्न सुरु होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. यामध्ये स्टेजिंगसाठी बांबू, तारा, पोल यासाठी अर्धा एकरासाठी सुमारे पंचवीस ते तीस हजाराचा खर्च आला. यामध्ये जास्त खर्च पेरूला फम व प्लॅस्टिक पिशवी लावण्यासाठी होतो. बनसुडे यांनी 85 हजार फम व सुमारे दोनशे किलो प्लॅस्टिक पिशवी चा वापर केला. सध्या मार्केटमध्ये फमशिवाय पेरूची खरेदी केली जात नाही. शिवाय फम लावल्यामुळे फळ लवकर मोठं होते. फळ रोगाला लवकर बळी पडत नाही. त्यामुळे बहुतेक शेतकरी पेरुला फम लावतात. यास एकरी 70 ते 80 हजाराचा खर्च होतो. त्यासाठी मजुरी देखील मोठ्या प्रमाणात आहे. प्रति फम व प्लॅस्टिक पिशवी लावण्यासाठी पन्नास पैसे इतका सरासरी खर्च पकडला तर एकरी सरासरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च होतो. सध्या बनसुडे यांनी बारा लाख रुपये उत्पन्न काढून सुमारे 9 लाख रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
रोगामुळे डाळिंब पिक नकोसे
इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब पिकावर तेल्या रोग आल्याने मोठे नुकसान झाले यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी कमी रोगाची बाग म्हणजे पेरूची लागवड करत आहे. यामध्ये तालुक्यातील माळेवाडी, पळसदेव, निमगाव केतकी, इंदापूर, शेळगाव, रुई इत्यादी गावात मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड होत आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात तैवान व गुजरात रेड, व्हीएनआर या प्रकारच्या जातीच्या पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरूची लागवड करत आहेत. शिवाय वेळेवर पेमेंट मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहे.
“पेरू या फळ पिकाची लागवड करून लाखो रुपये मिळवता येत आहेत. त्यामुळे शेतकत्यानी इतर परवानगी नसलेली पिके घेऊन कोर्ट कचेरीच्या चक्कर मारण्यापेक्षा पेरू व इतर फळ पिकाची लागवड करून लखपती व्हावे. या पेरूची लागवड व संगोपन यासाठी संजय हरिबा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. अनेक शेतकरी आमच्या प्लॉटला भेट देत आहेत.”
-बासाहेब बनसुडे, पेरूउत्पादक माळेवाडी (पळसदेव)