अहमदाबाद – विराट कोहलीचे द्विशतक अवघ्या 14 धावांनी हुकले मात्र, त्याने अक्सर पटेलसह विक्रमी भागादारी करत भारतीय संघाला पहिल्या डावात 571 धावांचा डोंगर उभारून दिला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 480 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनीही जशास जशी फलंदाजी केली. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 3 धावा केल्या असून आता ते 88 धावांनी पिछाडीवर आहेत. भारताच्या फिरकी गोलंदाजांनी काही चमत्कार केला तरच भारताला विजयाची संधी आहे.
Stumps on Day 4⃣ of the Fourth #INDvAUS Test!#TeamIndia 🇮🇳 88 runs ahead in the Final Test and Australia will resume batting tomorrow at 3/0.
We will back tomorrow with Day 5 action!
Scorecard – https://t.co/8DPghkx0DE @mastercardindia pic.twitter.com/Rf72OD81YR
— BCCI (@BCCI) March 12, 2023
शनिवारच्या 3 बाद 289 धावांवरून चौथ्या दिवशी खेळ सुरु झाल्यावर विराट कोहली व रवींद्र जडेजाने संयमी फलंदाजी केली. सेट झाल्यावर मात्र, जडेजाने वेगाने धावा जमवल्या. मात्र, याच आततायीपणामुळे तो 28 धावांवर बाद झाला. त्यानंतर यष्टीरक्षक श्रीकर भरतने कोहलीला सुरेख साथ देत संघाला चारशे धावांच्या जवळ पोहोचवले. भरतही 88 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांसह 44 धावांवर बाद झाला. दरम्यान कोहलीने आपले शतक साकार केले.
लक्षवेधी…
– कोहलीचे 75 वे आंतरराष्ट्रीय शतक
– ऑस्ट्रेलियाविरुद्धचे 8 वे कसोटी शतक
– 2019 सालानंतर प्रथमच कसोटी शतक
– कसोटी कारकीर्दीतील 28 वे शतक
– तब्बल 1206 दिवसांनी शतकी खेळी
यावेळी अक्सर पटेल व कोहली यांची जोडी जमली. या जोडीने सहाव्या गड्यासाठी 162 धावांची भागीदारी केली. कोहलीने दीडशतकी पल्ला पार केला व द्विशतकाकडे कूच केले. दरम्यान पटेलनेही अर्धशतक पूर्ण केले. त्यांनी संघाला साडेपाचशे धावांपुढे पोहोचवले. पटेल लंगात आलेला असताना व शतकाचीही संधी असताना 79 धावांवर अनाकलनिय फटका मारून बाद झाला.
या खेळीत त्याने 113 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 4 षटकार फटकावले. पटेल बाद झाल्यावर आलेल्या रवीचंद्रन अश्विनने थोडी चमक दाखवली मात्र, तो अनावश्यक फटका मारून परतला. त्यानंतर दुहेरी धावा घेण्याच्या कोहलीच्या आग्रहाला उमेश यादव बळी पडला व धावबाद झाला.
पाठीला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर फलंदाजीला उतरु शकला नाही. यावेळी खेळपट्टीवर महंमद शमी दाखल झाला होता. तेव्हा कोहलीला आपले द्विशतक खुणावत होते. त्यामुळे त्याने आक्रमक धोरण स्वीकारले. मात्र, याच प्रयत्नात तो 186 धावांवर बाद झाला व त्याचे द्विशतक हुकले.
या खेळीत कोहलीने तब्बल 364 चेंडू केळताना केवळ 15 चौकार फटकावले. 2019 सालानंतरचे कोहलीचे हे पहिलेच कसोटी शतक ठरले. ऑस्ट्रेलियाकडून टॉड मर्फी व नाथन लॉयन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. मॅथ्यु कुहनेमन व मिचेल स्टार्क यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
ICC World Test Championship : श्रीलंकेने वाढवली Team India ची चिंता
91 धावांच्या पिछाडीवरून आपला दुसरा डाव सुरु केल्यावर ऑस्ट्रेलियाने खेळ थांबला तेव्हा बिनबाद 3 धावा केल्या असून ते आता 88 धावांनी पिछाडीवर आहेत. सलामीवीर ट्रॅव्हीस हेड 3 धावांवर खेळत आहे. तर, नाइट वॉचमन म्हणून सलामीला फलंदाजीला आलेला कुहनेमनला अद्याप खाते उघडायचे आहे. सोमवारी सामन्याचा पाचवा व अखेरचा दिवस असून भारतीय गोलंदाजांनी विशेषतः फिरकी गोलंदाजांनी काही चमत्कार केला तरच या सामन्याचा निकाल लागू शकतो अन्यथा हा सामना अनिर्णित राहण्याचीच शक्यता जास्त आहे.
अय्यरच्या दुखापतीचा संघाला फटका
भारतीय संघाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याला अचानक पाठदुखाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच्या पाठीचे स्कॅनिंग झाले असून अद्याप याबाबत आणखी कोणतीही माहिती बीसीसीआयने दिलेली नाही. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी अय्यरने पाठ दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले.
द्विशतक हुकल्याने निराश
विराट कोहलीला द्विशतक पूर्ण करण्यासाठी अवघ्या 14 धावा कमी पडल्या. समोरुन फलंदाज बाद होत असताना कोहलीने खेळपट्टीवर तंबू ठोकला होता. त्याला अक्सर पटेलनेही सुरेख सेथ दिली मात्र, पटेल बाद झाल्यावर रवीचंद्रन अश्विन व उमेश यादव यांनी साफ निराशा केली. त्यातच पाठदुखीमुळे अय्यर फलंदाजीला उतरु शकला नाही. महंमद शमी बाद झाला तर द्विशतकाची संधी जाइल या विचाराने कोहलीनेही उंचावरून फटका मारण्याचा प्रयत्न केला व तो 186 धावांवर टॉड मर्फीच्या गोलंदाजीवर मार्नस लेबुशेनकडे झेल देत बाद झाला.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 480 धावा. भारत पहिला डाव – 178.5 षटकांत सर्वबाद 571 धावा. (विराट कोहली 186, शुभमन गिल 128, अक्सर पटेल 79, श्रीकर भरत 44, चेतेश्वर पुजारा 42, रोहित शर्मा 35, रवींद्र जडेजा 28, टॉड मर्फी 3-113, नाथन लॉयन 3-151, मॅथ्यु कुहनेमन 1-94, मिचेल स्टार्क 1-97). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 6 षटकांत बिनबाद 3 धावा. (ट्रॅव्हीस हेड खेळत आहे 3, मॅथ्यु कुहनेमन खेळत आहे 0).