- वायसीएमच्या स्टाफ नर्स आंदोलनाच्या पवित्र्यात
- इतर सुविधांमध्येही दुजाभाव
पिंपरी – करोनाच्या भीषण काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हजारो रुग्णांची सेवा करुन जीव वाचविणात मदत करणाऱ्या परिचारिकांना करोना योद्धा म्हणून संबोधले जाते. परंतु या करोनायोद्ध्यांवर सध्या आंदोलन करण्याची वेळ आली आहे. करोनाकाळात परिचारिकांना कायमस्वरुपी करुन घेणार, पगारवाढ देणार अशा अनेक घोषणा करण्यात आल्या. परंतु या आश्वासनांची पूर्तता तर दूरच या परिचारिकांच्या मानधनातही कपात करण्यात आली . यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये गेल्या 12 वर्षांपासून मानधनावर कार्यरत असणाऱ्या स्टाफ नर्स आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
करोनाकाळात महापालिकेने ऑगस्ट 2020 मध्ये या स्टाफ नर्संना कायमस्वरुपी सामावून घेण्याचा ठराव केला, मात्र अद्याप त्यांना मानधनावरच ठेवण्यात आले आहे. उलट करोनाच्या भयंकर परिस्थितीमध्ये काम केले असतानाही त्यांच्या मानधनात कपात करण्यात आले आहे. त्यामुळे गेली 12 वर्ष प्रामाणिकपणे पालिकेच्या सेवेत असलेल्या परिचारिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
पिंपरीतील वायसीएम रुग्णालयामध्ये करोनाच्या दोन्ही लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यात आले. वायसीएम रुग्णालय हे पालिकेचे शहरातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. याठिकाणी 700 बेडची क्षमता आहे. करोनाच्या काळात रुग्णालयावर मोठा ताण होता. या काळात येथील कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा केली. याठिकाणी गेल्या 12 वर्षांपासून परिचारिका मानधनावर कार्यरत आहेत. त्यांना कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय सुविधा व इतर आर्थिक लाभ दिले जात नाहीत. या परिचाररिकांना महापालिकेच्या कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यासाठी महापालिकेने महासभेमध्ये ठराव केले. त्याला महापौरांनी मान्यता दिली. मात्र, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अद्याप त्यांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात आले नाही.
काळ्या फिती लावून निदर्शने करणार
करोनामध्ये या परिचारिकांनी रात्र-दिवस रुग्णांची सेवा केलेली असतानाही त्यांनी केलेल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. या काळात त्यांच्या मानधनात वाढ न करता उलट 2 हजार रुपये कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. फेब्रुवारी 2021 पासून परिचारिकांच्या मानधनात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे. येत्या 15 जूनला परिचारिका आंदोलन करणार आहे. तसेच प्रशासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून निदर्शने करणार आहेत.