लाहोर – पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) इंग्लंड आणि वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 संघांची घोषणा केली. यात पॉवर हिटर आझम खानची प्रथमच टी-20 संघात निवड झाली आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच हेलिकॉप्टर शॉट खेळण्यात प्रसिद्ध असलेल्या आझमकडून पाक मंडळाला फिनिशर खेळाची अपेक्षा आहे.
पाकिस्तान इंग्लंडविरुद्ध 3, तर आणि वेस्ट इंडीजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. आझम हा पाकिस्तानचे माजी यष्टीरक्षक-फलंदाज मोईन खान यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षीच्या पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) स्पर्धेपासून निवड समितीला त्याने प्रभावित केले आहे.
पहिल्याच चेंडूपासून आक्रमक फलंदाजी करण्यासाठी आझम ओळखला जातो. पीएसएलच्या यंदाच्या पहिल्या टप्प्यात आझमने तळात फलंदाजीला येऊन पाच सामन्यांत 144 च्या स्ट्राइक रेटने 98 धावा केल्या. मागील हंगामात आझमने 9 सामन्यांत 130 च्या स्ट्राइक रेटने 150 धावा केल्या. आझम खानने पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लेडिएटर्सचे प्रतिनिधित्व केले होते आणि सध्या तो अबुधाबीत आहे. पीएसएलचा दुसरा टप्पा 9 जूनपासून सुरू होईल. आझम खानने आतापर्यंत फिनिशरची भूमिका साकारली आहे.
इंग्लंड आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतही हाच फॉर्म कायम ठेवण्यासाठी तो सज्ज आहे. सामन्यांपूर्वी आत्मविश्वास वाढावा, अशी त्याची इच्छा आहे. भारतीय संघात धोनीची जी फिनिशरची भूमिका होती, तीच भूमिका आझमची पाकिस्तान संघात आहे. आझमने आतापर्यंत 36 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 157.41 च्या स्ट्राइक रेटने 743 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 45 षटकार आणि 67 चौकार ठोकले आहेत.