मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यास करावा, बेस पक्का करावा, त्यानंतर बोलावं, असा सल्ला राऊतांनी दिला.
संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला ‘एक शरद बाकी गारद’ऐवजी, ‘एक नारद बाकी गारद’ असे शीर्षक द्यायला हवे होते, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. तसेच बाकी सर्व गारद म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही गारद का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला होता, याला आज संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.
संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस राजकारणात नव्हते, त्याआधी शरद पवार यांच्या राजकीय झंझावातावर बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये अग्रलेख लिहिला होता, त्याचं हे टायटल आहे.
एक शरद बाकी गारद, हे बाळासाहेबांनी म्हटलं होतं त्या काळात. खरंतर बाळासाहेबांनी त्यावेळी दोन शरदांविषयी लिहिलं होतं, दुसरे शरद म्हणजे शरद जोशी. त्यामुळे त्यांनी ‘दोन शरद सगळे गारद’ असं म्हटलं होतं. आता एक शरद नाहीत, त्यामुळे राहिले एकच शरद.
त्यामुळे फडणवीसांनी अभ्यासात थोडा बेस पक्का करावा लागेल. हे बाळासाहेबांचं वाक्य आहे, पवारांविषयी म्हटलेलं. तेव्हा ते राजकारणात नव्हते. आम्ही बाळासाहेबांसोबत काम करत होतो, असे संजय राऊत म्हणाले.