मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्तधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले.
सभागृहात चर्चा सुरु असताना नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 15 लाखांच्या आश्वासनाचा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी कधीच असे बोलले नाही, असा दावा केला. त्यावर भास्कर जाधव यांनी जागेवर उभे राहत नरेंद्र मोदी यांच्या शैलीत त्यांची वाक्य बोलून दाखवत नकल केली.
दरम्यान जाधव यांनी केलेल्या नकलेमुळे फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला. सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल करणे, हे योग्य नव्हे. सभागृहात अशाप्रकारचा पायंडा पडता कामा नये, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
यावेळी फडणवीस यांनी जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली. सभागृहात असं चालू देणार नाही. पंतप्रधानांविषयी अशाप्रकारे अंगविक्षेप करुन बोलताना लाज वाटली पाहिजे. यासाठी भास्कर जाधव यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.