केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सूचना
नवी दिल्ली : देशाच्या विविध भागात आवश्यक वस्तूंची सुरळीत वाहतूक करणे गरजेचे असल्यामुळे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व राज्यांना आंतरराज्य सीमेलगतची ट्रक आणि लॉरीजची नाकेबंदी लवकरात लवकर दूर करण्याचे आवाहन केले आहे. “कोविड -19′ ला आळा घालण्यासाठी जाहीर लॉकडाऊनच्या अनुषंगाने जनतेचे जीवन सुलभ करण्यासाठी ट्रक वाहतूक सुरळीत करण्याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.
व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राज्यांच्या रस्ते वाहतूक मंत्र्यांच्या बैठकीत बोलताना गडकरी यांनी मंत्र्यांना अशा बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचे आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. तसेच चालक आणि क्लिनर यांनी वाहन चालवताना आणि ढाब्यांच्या ठिकाणी आरोग्यविषयक सूचना आणि सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर्सचा वापर यासारख्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे असे त्यांनी अधोरेखित केले.