फेसबुकने दिल्ली विधानसभेच्या समितीपुढे येणे टाळले

नवी दिल्ली – सामाजिक सद्‌भावनेचे वातावरण बिघडवल्याच्या कारणावरून दिल्ली विधानसभेच्या संबंधित समितीने फेसबकुला समितीच्या समोर सुनावणीसाठी हजर राहण्याचा आदेश दिला होता. आज ही सुनावणी होणार होंती पण फेसबुकने या समितीपुढे हजर राहण्याचे टाळले आहे.

हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो आणि आम्ही केंद्रीय समितीपुढे आमची बाजू मांडली आहे अशी भूमिका फेसबुकने घेतली आहे. त्यांच्या या उत्तरामुळे दिल्ली विधानसभेची समिती मात्र अवाक झाली आहे. फेसबुक कंपनीने दिल्ली विधानसभेचा अवमान केला आहे असे या समितीचे अध्यक्ष राघव चढ्ढा यांनी म्हटले आहे.

दिल्लीत फेब्रुवारी रोजी झालेल्या दंगलीच्या संबंधात फेसबुकवर जे आरोप आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यावर आपल्या अखत्यारीत सुनावणी करण्याचा अधिकार दिल्ली विधानसभेच्या संबंधित समितीला आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

फेसबुकने हा पळवाटीचा मार्ग शोधला असला तरी या समितीने त्यांना पुन्हा या संबंधात समन्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जर त्यांनी पुन्हा आमच्या या समन्सला प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याशिवाय आमच्यापुढे पर्याय राहणार नाही असेही चढ्ढा यांनी सांगितले.

दिल्ली दंगलीच्या काळात फेसबुकवर अत्यंत प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकने जाणिवपुर्वक पसरवू दिल्या आहेत. त्यांचे हे कृत्य सामाजिक सलोखा बिघडवणारे आणि गंभीर आहे अशी दिल्ली सरकारची भूमिका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.