पुणे – सेवानिवृत्त सहायक फौजदारावर कोयत्याने वार करून मोबाइल चोरणाऱ्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. या सराईत गुन्हेगारांच्या तपासात स्वारगेट येथे झालेली हत्या, लक्ष्मी रस्त्यावर सराफाची झालेली लूट आणि मध्यवर्ती भागात लुटीचे घडलेले प्रकार उलगडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच वाढत्या गुन्हेगारीचे हे ‘येरवडा’ कनेक्शन उघड झाले आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आणि तांत्रिक तपास करून या आरोपींना ताब्यात घेतल्याने लॉकडाऊननंतर शहरात लुटमारीचे प्रकार वाढले, की काय? अशी वाटणारी भीती कमी होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिव्हा, कोयता आणि चोरलेला मोबाइल हस्तगत केला. पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी शहरातील तब्बल 68 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर गाडी येरवडा परिसरातील असल्याचे कळाल्यावर गाडी मालकाचा शोध घेण्यासाठी पथक येरवडा परिसरात तब्बल 15 दिवस शोध घेत होते. अश्पाक मोहंमद शेख (29, रा. अशोकनगर, येरवडा) सुशील मुकुंद निकम (26, रा.गणेशनगर, येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील अश्पाक हा सराईत असून त्याच्यावर 2016 पूर्वी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी सेवानिवृत्त सहायक पोलीस फौजदार प्रकाश जयकुमार बुरले (58, रा. स्वारगेट पोलीस लाइन) हे त्यांच्या मित्रासोबत 25 ऑगस्ट रोजी रात्री घनश्याम लॉजसमोरुन पायी घरी जात होते.
यावेळी ऍक्टिव्हावरून आलेल्या आरोपींनी बुरले यांच्या खिशातील मोबाइल हिसकावला. त्यांनी विरोध करताच आरोपींनी धारदार कोयत्याने त्यांच्या उजव्या हाताच्या पंजावर वार करून पळ काढला. गुन्हा दाखल झाल्यावर शोध घेत असताना पोलीस कर्मचारी समीर माळवदकर व बंटी कांबळे यांना हा गुन्हा सराईत अश्पाक शेख याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अश्पाक आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. यामध्ये दोघांनी गुन्हा कबूल केला.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलीस निरीक्षक सुशील बोबडे, उमाजी राठोड, पोलीस कर्मचारी अजीज बेग, विनोद जाधव, गणेश सातपुते, संदीप पाटील, सागर केकाण, समीर माळवदकर, बंटी कांबळे, राकेश क्षीरसागर, रवी लोखंडे, योगेश जाधव, इम्रान नदाफ यांच्या पथकाने केली.
‘त्या’ हत्येचा उलगडा होणार का?
स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल चोरांनी प्रतिकार करणाऱ्या एका तरुणाचा खून केला होता. हे गुन्हेगारही ऍक्टिव्हावरूनच आले होते. त्यांची मोडसही खडक पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींसारखीच होती. त्यांचा या व इतर गुन्ह्यांशी काही संबंध आहे का? हे पोलीस तपासून पहात आहेत.