पाकिस्तानातील गुन्हेगारी वाढली

अमेरिकेच्या दूतावासाचा इशारा

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये प्रवास करणाऱ्या अमेरिकेतील नागरिकांसाठी अमेरिकेच्या दूतावासाने एक धोक्‍याचा इशारा दिला आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या रस्त्यांवरील गुन्हेगारीचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. त्यामुळे तेथे जाणाऱ्या अमेरिकेच्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, असे या मार्गदर्शक सूचनेमध्ये म्हटले आहे. 

इस्लामाबादेतील गुन्हेगारीविषयीचे रिपोर्ट अमेरिकेच्या दूतावासाला नियमितपणे मिळत असतात. त्यात प्रामुख्याने जी-6, एफ-6, एफ-7, एफ-10 आणि आय-10 या भागांमधील गुन्हेगारीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

यामध्ये पादचाऱ्यांना लुटण्यासाठी होणारे हल्ले, पर्स, मोबाईल हिसकावणे, वाहने पळवून नेणे यासारख्या भुरट्या चोऱ्या वारंवार घडत आहेत. अशा चोरांपासून सुरक्षित राहण्यासाठी अमेरिकेच्या दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य प्रकारे पालन करण्यात यावे, असे या इशाऱ्यात म्हटले आहे.

विशेषतः बाजारात फेरफटका मारताना, प्रार्थनास्थळांजवळ नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. आपल्याजवळ उंची वस्तू असल्याचे दर्शवू नका. मौल्यवान ज्वेलरी, घड्याळे आणि इअर रिंग्ज बाहेर जाताना घालू नका. पाकिस्तानातील गुन्हेगारीच्या वाढत्या प्रमाणाला ‘लेव्हल 3’ चे लेबल देण्यात आले आहे.

याशिवाय वेगवेगळ्या दहशतवादी संघटना पाकिस्तानात घातपाती कारवांचे कट रचत असतात. त्यामुले गर्दीच्या ठिकाणी जातानाही नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे या इशाऱ्यामध्ये म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.