पुणे – तंत्रनिकेतनांतील पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत नुकतीच संपली आहे. त्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने ऑनलाइन अर्जांसाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता विद्यार्थ्यांना 15 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्याचप्रमाणे नियमित तीन प्रवेश फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे तंत्रनिकेतनांतील पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी राज्यभरात एक लाखाहून अधिक जागा आहेत. दहावीचा निकाल जाहीर होण्याअगोदर अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्यास होणारा उशीर विचारात घेऊन कागदपत्रे सादर करण्यास आता दुसऱ्या फेरीपर्यंत संधी देण्यात आल्याची माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिली आहे.
तंत्रशिक्षणचे वेळापत्रक
अर्ज करण्याची मुदत : 15 जुलै
तात्पुरती गुणवत्ता यादी : 17 जुलै
आक्षेपासाठी मुदत : 18 ते 19 जुलै
अंतिम गुणवत्ता यादी : 21 जुलै