प्रवेशासाठी 20 जुलैपर्यंत करता येणार अर्ज
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकुलात असणाऱ्या पदवी, पदव्युत्तर, आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमांसाठी आवश्यक असलेली प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना विद्यापीठातील प्रवेशासाठी 20 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.
विद्यापीठात पदवी, पदव्युत्तर विभाग, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आता प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. याच्या गुणांनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यासाठी विद्यार्थांना 30 जूनपर्यंत मुदत दिली होती. मात्र, विविध अभ्यासक्रमांचा निकाल रखडला आहे.
करोनामुळे अनेक अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज करता येणे शक्य नाही. त्याचा विचार करून विद्यापीठाने प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास 20 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली, अशी माहिती विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपसचिव उत्तम चव्हाण यांनी दिली. प्रवेशासाठी अर्ज केल्यानंतर परीक्षेची तारीख आणि निकाल संबंधित विभागाकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.
पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करताना मागील वर्षाची उत्तीर्णतेची गुणपत्रिका, जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र याचे फोटोकॉपी अपलोड करावी लागेल. दिव्यांग विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच काही कागदपत्रे करोनामुळे उपलब्ध नसतील, अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडे ई-मेल करावेत. त्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले.