लंडन – ब्रिटनमध्ये मूळ भारतीय असलेल्या 763 लोकांचा मृत्यू करोना विषाणूमुळे झाला असल्याची आकडेवार समोर आली आहे. ब्रिटन सरकारने सांगितले की, करोना संसर्गाच्या वाढत्या संख्येमुळे काही स्थानिक स्तरावर लॉकडाऊन करण्याची योजना आहे. कारण नवीन आकडेवारीनुसार लक्षात आले आहे की, ब्रिटेनमधील अल्पसंख्याक समुहातील मूळ भारतीय असलेले लोक जास्त बाधित आहेत.
गृहमंत्री प्रीती पटेल यांनी स्थानिक स्तरावरील लॉकडाऊनसंबंधी पुष्टी केली आहे. पूर्व ब्रिटेनमधील मूळ भारतीयांची बरीच लोकसंख्या आहे. पटेल यांनी म्हटले की, आम्ही या भागात मागील तीन-चार आठवड्यांपासून करोना बाधितांची वाढती संख्या पाहत आहोत.
येथील लोकांना सर्वप्रकारची मदत पुरवली जात आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रयत्न महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे तंतोतंत पालन, चाचण्या अधिकाधिक वाढवणे आणि इतरही उपाययोजना सुरू असल्याचे पटेल यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये 4 जुलैपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आहे. यात बार, रेस्तरॉं आणि चित्रपटगृहांनाही परवानगी दिली आहे. तसेच ब्रिटेनमध्ये मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे, अशा वेळी पटेल यांनी स्थानिक लॉकडाऊन करण्याचे विधान केले आहे.