पुणे – शहरासह जिल्ह्यात जुलै महिन्यातही जोरदार पाऊस पडेल, अशी शक्याता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली. मात्र, आता निम्मा महिना संपला तरी उघडीप दिलेल्या पावसाचा जोर वाढेना. धरण क्षेत्रातही पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पुणेकर चिंतेत आले असून, जिल्ह्यात शेतकरीही चांगल्या पावसाची वाट पाहत आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिले दोन दिवस चांगला पाऊस झाला. त्यामुळे जूनअखेर सुरू झालेला पाऊस आता जुलै महिन्यात चांगला पडेल असे वाटत होते. मात्र, मागील नऊ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे ऊन आणि ढगाळ वातावरण असे वातावरण शहरात पाहायला मिळत आहे. तसेच शहरातील कमाल तापमानातही दोन ते तीन अंशाने वाढ झाली आहे. 27 अंशाच्या खाली गेलेले कमाल तापमान आज 32 अंशावर जावून पोहचले. दरम्यान, शहरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील, दुपारनंतर ढगाळ वातावरण असेल तर पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
घाटमाथ्यावर पुन्हा जोर ओसरला…
घाटमाथ्यावर दोन दिवसांपूर्वी वाढलेला पावसाचा जोर पुन्हा ओसरला आहे. त्यामुळे गेल्या 24 तासात बहुतांश भागात 50 मिमीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये शिरगाव येथे 35, अंबवने 26, ताम्हिणी 30, भिरा 20, धावडी 50, डुंगरवाडी 30, कोयना 20 मिमी पावसाची नोंद झाली.