पुणे -एका बाजूला शहरातील ई-वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिका पुढाकार घेत असल्याचे पालिका प्रशासन गवगवा करत असले तरी, या वाहनांच्या चार्जिंगासाठी मात्र, पुणेकरांचा खिसा कापण्याचा घाट पालिका प्रशासनाने घातला आहे. एका बाजूला शहरात महावितरणच्या चार्जिंग स्टेशनवर ईव्ही’साठी प्रति युनिट 13 रुपये 25 पैसे इतका दर आकारला जात असतानाच, महापालिकेकडून उभारण्यात येणाऱ्या चार्जिंग स्टेशनवर ग्राहकांना प्रति युनिट साठी 22 रुपये इतके मोजावे लागणार आहेत.
त्यामुळे, महावितरणच्या तुलनेत प्रतीयुनिट जवळपास 9 रूपये जादा मोजावे लागणार असल्याने पुणेकर महापालिकेच्या चार्जिग स्टेशनकडे पाठ फिरविण्याची शक्यता आहे. पालिकेच्या सुमारे 82 मिळकतींच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.
महापालिकेकडून कमी दराची अपेक्षा
पेट्रोल, डिझेल या इंधनाच्या तुलनेत सीएनजी या इंधनावर धावणाऱ्या वाहनांची विक्री वाढली होती. परंतु गेल्या वर्षभरात सीएनजीचे दर हे पेट्रोल, डिझेलच्या दराजवळ पोचले आहे. आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने तसेच पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांकडून ई-वाहने खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे, शहरातील ई-वाहनांची संख्या जवळपास 54 हजारांवर गेली आहे. या खासगी चार्जिंग स्टेशनमध्ये प्रति युनिट 18 ते 30 रुपयापर्यंत शुल्क आकारले जात आहे. मात्र, आता महापालिकेकडून शहरात ई-वाहनांना प्रोत्साहन देणे आवश्यक असताना महापालिका मात्र, महागड्या दराने चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.