Corona | मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती, त्यामुळे…

नागपूर – राज्यातील करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहता मे अखेरीपर्यंत राज्यात विस्फोटक परिस्थिती राहील, असे मत तज्ज्ञांनी मांडल्यामुळे करोनाची साखळी तोडायची असेल तर 14 दिवसांच्या लॉकडाऊनशिवाय पर्यायच नसल्याचे सांगतानाच माणसे मरत असताना उत्सव कशाला साजरे करत आहात, असा सवाल राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वीकेंड लॉकडाऊन नंतरही राज्यभर आज गर्दी होत आहे. ही गर्दी अतिशय घातक असल्यामुळे नागरिकांची गर्दी रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. ही परिस्थिती भविष्यात अधिक भयावह होणार आहे. या करोनातून वाचायचे असेल तर अजिबात घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन होईल, तेव्हा होईल. पण तुम्ही घराबाहेर पडू नका. जर परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्रात मृतदेहांचा खच पडेल, अशी भीती वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आठवडाभराचा लॉकडाऊन व्हावा, असे वाटत आहे. परंतु आठ दिवसांच्या लॉकडाऊनने काहीही होणार नाही. करोनाची साखळी मोडायची असेल तर किमान 14 दिवसाचा लॉकडाऊन असला पाहिजे. तरच साखळी तोडता येईल. पण, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच होईल. 

लॉकडाऊन करताना कुणाला काय मदत करायची याचा विचार केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याचा आढावा घेत असून येत्या दोन चार दिवसात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. उद्या गुढीपाडवा आहे आणि 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्यामुळे 15 एप्रिल रोजी लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

काही गोष्टींना लॉकडाऊन करताना सूट देऊन चालणार नाही. याकाळात मुंबईतील लोकलवर निर्बंध लावायचे की नाही, याचाही निर्णय घ्यावा लागणार आहे. कॅबिनेटमध्ये त्याबाबत चर्चा होईल. कारण मुंबईतील लोकलची गर्दी थांबवावीच लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लस नाही अन उत्सव कशाचा?

राज्यात करोनाची लस नाही. लसीची लोक प्रतिक्षा करत आहेत. माणसे मरत आहेत. मग लसीकरण उत्सव कशाला? असा सवाल करतानाच करोनावर विजय मिळवल्यानंतर उत्सव करता येईल. त्यासाठी एवढी घाई कशाला?, असा सवालही त्यांनी केला. लॉकडाऊन आणि लसीच्या पुरवठ्याबाबत कुणी राजकारण करू नये. कुणी उपकाराची भाषा करत असेल तर ती पदाशी बेईमानी ठरेल, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.