एका दिवसात 581 जणांना लागण
पिंपरी – सोमवारी शहरात “करोना’चा विस्फोट पहायला मिळाला. एकाच दिवसात तब्बल 581 जणांचे “करोना’ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापैकी 573 रुग्ण शहरातील आहेत, तर आठ रुग्ण शहराबाहेरील असून शहरात उपचार घेत आहेत. यामुळे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा तब्बल 4861 वर पोहचला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढल्याने आज जुन्या रुग्णांना मोठ्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आले. महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये असलेल्या 363 रुग्णांना घरी सोडण्यात आले. एवढा मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांसह खासगी रुग्णांलयांचीही क्षमता संपली आहे. महापालिकेचे करोनासाठी समर्पित वायसीएम व भोसरी नवीन रुग्णालय फुल्ल झाले आहे. सद्यस्थितीत शहरात 1967 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज खेड येथील एका 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मृतांची संख्याही शंभरीच्या जवळ पोहचली आहे. आजपर्यंत एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 67 तर शहराबाहेरील 32 रुग्णांचा समावेश आहे.
शहरातील 1863 व शहराबाहेरील 104 रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोमवारी एकाच दिवशी 614 संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. 1392 रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. खासगी रुग्णालये देखील फुल्ल झाली आहेत. महापालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना अवघ्या दोन ते तीन दिवसांत घरी सोडण्यात येत आहे. रुग्णांना घरी सोडल्यानंतरच नवीन रुग्णांना जागा मिळत आहे.
मावळात 10 करोनाबाधित
मावळ तालुक्यात सोमवार (दि. 6) रोजी करोनाच्या 10 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण 145 रुग्ण झाले आहेत. शहरी 56 व ग्रामीण 89 आहेत. माळवाडी (ता. मावळ) येथील एका कुटुंबातील चौघांना करोनाची बाधा झाली आहे. सोमाटणे (ता. मावळ) येथील 64 वर्षीय पुरुष करोनाबाधित झाला त्यांच्या संपर्कातील चौघांना सोमवार (दि. 6) रोजी बाधा झाली. तळेगाव दाभाडे येथे रियो कॉलनीतील 47 वर्षीय करोनाबाधित रुग्ण आढळला. कामशेत (ता. मावळ) येथे 45 वर्षीय महिला करोनाबाधित झाली. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व समन्वयक डॉ. गणेश बागडे यांनी माहिती दिली.