जम्मू-काश्‍मीरमधील सीएच्या विद्यार्थ्यांचे शुल्क माफ

“आयसीएआय’चा निर्णय : लडाख येथे संस्थेचे नवीन कार्यालयदेखील लवकरच


पुण्यात दोन दिवस आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन

पुणे – जम्मू-काश्‍मीरचे 370 कलम हटविल्यानंतर येथील सीए (सनदी लेखापाल) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतला आहे. या शुल्कमाफीचा लाभ
पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांना देखील मिळणार आहे. तसेच लडाख येथे संस्थेचे नवीन कार्यालय सुरू करण्यात येणार असल्याची माहिती “आयसीएआय’च्या बोर्ड ऑफ स्टडीजच्या अध्यक्षा केमिशा सोनी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

“आयसीएआय’ने सीएच्या विद्यार्थ्यांसाठी दि.14 आणि 15 डिसेंबर रोजी म्हात्रे पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्याची माहिती सोनी यांनी यावेळी दिली. याप्रसंगी परिषदेचे उपाध्यक्ष
दुर्गेश काबरा, वंदना नागपाल, परिषदेचे संचालक चंद्रशेखर चितळे, तसेच आनंद जाखोटिया, यशवंत कासार, परिषदेच्या समन्वयक ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे, सचिव समीर ला, खजिनदार काशिनाथ पाठारे उपस्थित होते. परिषदेचे उद्‌घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, प्रकाश जावडेकर, खासदार राजवर्धन सिंग राठोड यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल छाजेड असतील. परिषदेचा समारोप राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्या उपस्थितीत होणार आहे.

परिषदेत कोणाचा असेल सहभाग
सार्क परिषदेतील देशांतूनही विद्यार्थी या परिषदेला येत आहेत. याशिवाय, या परिषदेत सीएचा अभ्यास करणारे, आयपीसीसी किंवा इंटरमिडिएट म्हणून नोंदणी असलेल्या तसेच सीपीटी परीक्षा पास केलेल्या, आर्टिकलशिप, ट्रेनिंग घेत असलेल्या, प्रॅक्‍टिकल ट्रेनिंग पूर्ण केलेल्या परंतु अंतिम परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही या परिषदेमध्ये सहभागी होता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.