“स्वारगेट’ कसे मोकळे-मोकळे

वाहतूक विभागाने नेमले 11 कर्मचारी : बेशिस्तांवर कारवाईचा धडाका

पुणे – स्वारगेट येथील देशभक्‍त केशवराव जेधे चौक वाहतूक कोंडीने ग्रासला आहे. बेशिस्त रिक्षाचालक, बसस्थानकाबाहेरील अस्ताव्यस्त एसटी बसेसमुळे चौकात अपघातही वाढले आहेत. यावर उपाययोजनेसाठी वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनांवर कारवाई सुरू केली आहे.

स्वारगेट चौकात चार मुख्य रस्ते येत असल्याने वाहतूक कोंडी होते. चौकात अनेक ठिकाणी अनधिकृतपणे रिक्षा थांबत असल्याने चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले होते. मात्र, अनेक उपाययोजना करून प्रश्‍न मार्गी लागला नव्हता. मात्र, काही दिवसांपासून 11 वाहतूक पोलीस चौकात ठेवून कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे सध्यातरी जेधे चौकातील कोंडी कमी झाल्याचे दिसत आहे.

2 शिवशाही बसेसना 10 हजारांचा दंड
इतर जिल्ह्यांतून येणारे शिवशाही बसचे चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. यामुळे जेधे चौक सतत कोंडीत बुडालेला असतो. मात्र, या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सोमवारी सायंकाळी नियम मोडणाऱ्या 2 शिवशाही बसला वाहतूक पोलिसांनी प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

 पीएमपीसाठी स्वतंत्र लेन
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) स्वारगेट येथील बसथांब्यावर बससाठी स्वतंत्र “लेन’ केली आहे. या लेनमधूनच पीएमपी बसची वाहतूक होणे अपेक्षित असून, येथून सुटणाऱ्या बस रस्त्याच्या डाव्या बाजूलाच उभ्या करण्याची सूचना केली आहे. या ठिकाणी बसच्या नियोजनासाठी पीएमपीच्या अधिकाऱ्यांसह तीन वाहतूक पोलीस कर्मचारी कार्यरत राहणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात
पीएमपी बसच्या ड्रायव्हर, कंडक्‍टरने लेनची शिस्त न पाळल्यास आणि वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने बस उभी केल्यास त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. त्यानुसार पीएमपीच्या अधिकाऱ्यांनीही कर्मचाऱ्यांना सूचना केल्या असून, त्यांच्या बेशिस्तीमुळे बसवर दंडात्मक कारवाई झाल्यास, तो दंड संबंधितांच्या वेतनातून कपात करून घेतला जाईल, अशी तंबी पीएमपी प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना दिली आहे.

 रस्त्यावरील पीएमपीचा भार कमी होणार
स्वारगेट येथील छत्रपती शाहू बसस्थानकाच्या जागेवर “मेट्रो’कडून खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे येथील बस रस्त्यावर थांबवाव्या लागत होत्या. आता बसस्थानकाची काही जागा पीएमपीला मिळणार असून, त्या ठिकाणी 10 बस उभ्या करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील पीएमपीचा भार कमी होणार आहे. परिणामी, येथील कोंडी फुटण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे.

जेधे चौकातील वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी चारही बाजूला वाहतूक पोलीस उभे केले आहेत. तसेच पीएमपी व रिक्षांसाठी स्वतंत्र लेन केल्याने इतर वाहनांना अडथळा न ठरता कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
– अतुलकुमार नवगिरे, वाहतूक पोलीस निरीक्षक, स्वारगेट

Leave A Reply

Your email address will not be published.