पुणे – करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये पुढील 14 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दहावी, बारावी परीक्षा वगळता अन्य नियोजित परीक्षा शक्यतो ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांना ऑनलाइन परीक्षांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सर्व शासकीय व खासगी शाळा, महाविद्यालये, सर्व खासगी क्लासेस व इतर शाळा दि.14 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आले आहेत. मात्र ऑनलाइन पद्धतीने शाळा, महाविद्यालये, सर्व खासगी क्लासेस सुरू राहणार आहे. अशा परिस्थितीत नियोजित परीक्षा आवश्यक असल्यास करोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करून घेण्यात याव्यात. शक्यतो ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्याव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.