कोरेगाव, (प्रतिनिधी) – “मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. तो राज्यघटनेने दिलेला पवित्र अधिकार आहे. बळकट लोकशाहीसाठी हा अधिकार सर्वांनी बजावावा”,असे आवाहन कृषी अधिकारी हेमांगी शेडगे यांनी केले.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या विसापूर येथे मतदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात झाला. 50 टक्के पेक्षा कमी मतदान असणाऱ्या मतदान केंद्रांवर विशेष भर दिला जात आहे. त्या अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. त्यावेळी श्रीमती शेडगे बोलत होत्या.
श्रीमती शेडगे म्हणाल्या,” मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वांनी एकत्रित मतदान करणे गरजेचे आहे. शंभर टक्के मतदान हे आपले ध्येय आहे. जर आपल्याला सर्व सुविधा हव्या असतील आणि आपल्याला आदर्श लोकशाही निर्माण करायची असेल तर तात्विक बळ येण्यासाठी शंभर टक्के मतदान अत्यंत गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी मतदान करावे.
यावेळी मतदान जनजागृती करणारे विविध पोस्टर्स तयार करण्यात आले होते. हे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी हाती घेऊन नागरिकांसह चिमुकल्यांनी देखील घोषणा दिल्या. गावातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मतदान जनजागृती शपथ यावेळी सर्वांनी घेतली. उर्मिला साळुंखे यांनी आभार मानले.